सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद संजवाड येथील सीना नदीवरील पूला जवळ दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे धोकादायक अवस्थेत आहे. महापुरामुळे पुलावरील दोन्ही बाजूचे लोखंडी सुरक्षा अँगल (संरक्षक कठडे) वाहून गेले असून, पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच, पुलाच्या दोन्ही बाजूचे जोड रस्ते खचले असल्याने या मार्गावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
हा पूल औराद आणि संजवाड या दोन गावांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून दिवस-रात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एनटीपीसी राख वाहतूक करणारे मोठे डंपर यासह इतर अवजड वाहने सातत्याने या पुलावरून जातात.
गेल्या वर्षी बसवलेले लोखंडी संरक्षक कठडे अतिवृष्टीच्या महापुरात वाहून गेल्याने पुलाला सध्या कोणतेही संरक्षण नाही.
या बंधाऱ्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
चारचाकी वाहने जाताना दुचाकीस्वारांना बाजूला थांबणेही धोकादायक बनले आहे.
या गंभीर स्थितीमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पुलाची दुरवस्था आणि सुरक्षेचा अभाव पाहता, ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून दुरुस्तीची मागणी होत आहे.
….
….
”येथील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र ती धोकादायकपणे सुरू आहे. प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने कोणताही मोठा अपघात होण्याची वाट न पाहता, लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करून संरक्षक कठडे बसवावेत,”
रामचंद्र बिराजदार , माजी तंटामुक्ती अध्यक्ष, संजवाड
….

















