सोलापूर – धनगर समाजाची गौरवशाली परंपरा, लोककला आणि संस्कृतीचा वारसा आपल्या पहाडी आवाजातून आणि ढोलाच्या गजरात जनमानसांत रुजवणारे लोकशाहीर बिरुदेव एडके यांना यंदाचा प्रतिष्ठित ’हालमत संप्रदाय संस्कृती संवर्धन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सांगली येथील ’हालमत संस्कृती संवर्धन संस्था’ यांच्या वतीने हा सोहळा हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कुंभोज येथे आयोजित या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी लोकशाहीर बिरुदेव एडके यांना त्यांच्या पत्नी शामल एडके यांच्यासह मंचावर गौरविण्यात आले. हा पुरस्कार डॉ. सुषमा पुजारी, सोनाली उद्योग सुमहाचे संदीप कारंडे, सिध्दाप्पा गावडे, वारणा दुध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप अत्यंत पारंपरिक आणि आदराचे होते. यामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, कोल्हापुरी फेटा, घोंगडी आणि श्रीफळ यांचा समावेश होता. धनगर संस्कृतीत घोंगडी आणि फेटा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे हा सन्मान एडके यांच्यासाठी भावनिक ठरला. ’हालमत’ संस्कृतीतील ओव्या, गीते आणि लोककथा जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी अविरतपणे केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
हालमत संस्कृती संवर्धन संस्था ही गेल्या नऊ वर्षांपासून धनगर समाजाच्या संस्कृतीचे रक्षण करणार्या आणि कलेचे जतन करणार्या कलावंतांचा सन्मान करत आहे. यंदा या पुरस्कारासाठी लोकशाहीर बिरुदेव एडके यांची निवड करण्यात आली. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, त्यांनी जपलेल्या लोककलेचा आणि निष्ठेचा सन्मान आहे.
या ऐतिहासिक क्षणी एडके यांचे कुटुंबीय आणि त्यांचे निकटवर्तीय बळीराम क्षिरसागर, पांडुरंग घोडके प्रामुख्याने उपस्थित होते. पांडुरंग घोडके यांनी एडके यांच्या कलाप्रवासात दिलेल्या योगदानाबद्दलही यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान आजच्या आधुनिक युगात आपली मूळ संस्कृती हरवत चालली आहे. अशा काळात बिरुदेव एडके यांच्यासारखे लोकशाहीर ग्रामीण भागातील कला जिवंत ठेवत आहेत. त्यांना हा पुरस्कार देताना संस्थेला अभिमान वाटत आहे. असे प्रतिपादन शाहिर सागर माने यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना लोकशाहीर बिरुदेव एडके भावूक झाले. त्यांनी म्हटले की, हा पुरस्कार म्हणजे माझ्या कलेला मिळालेली पावती आहे. माझ्या कुलदैवताची ओवी गायण हा संस्कृतीचा कणा आहे, आणि तो सन्मान मला मिळाल्यामुळे माझी जबाबदारी आता अधिक वाढली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या संस्कृतीचा अणि कुलदैवतांचा प्रसार आणि ओवी गायण करणार आहे.
या पुरस्कारामुळे लोकशाहीर बिरुदेव एडके यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोककलेच्या क्षेत्रात काम करणार्या नवीन पिढीसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार आहे.






















