पुणे – बहुजन, दलित तसेच वंचित-पीडित-उपेक्षितांचा बुलंद आवाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदास आठवले यांच्या दुरदृष्टी तसेच समाजभिमुख नेतृत्वाने प्रेरित होवून बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी आरपीआय (आ) पक्षात प्रवेश केला आहे. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात मा.आठवले साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश करतांना डॉ.चलवादी यांनी साहेबांच्या नेतृत्वात बहुजन चळवळीसाठी काम करण्याचा निर्धार केला आहे.
डॉ.चलवादी यांच्यासह बसपचे पुणे जिल्हा प्रभारी अनिल त्रिपाठी, चलवादी माळा विकास महासंघाचे अध्यक्ष भीम सिंह चलवादी, अॅड.प्रदीप चिंचोलीकर, निवृत्त आयपीएस अधिकारी अविनाश मस्के, निवृत्त प्रॉव्हिडंट फंड आयुक्त विकास जावळे, प्रकाश सोनवणे, सुधीर वाघमोडे, माजी नगरसेवक संतोष आरडे यांनी पक्षप्रवेश केला. कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश महासचिव गौतम सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, आरपीआय (आ) पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, इतर माजी नगर सेवक व पुणे व प्रदेश कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मा.आठवले साहेबांच्या नेतृत्वात बहुजन चळवळीला नवी उर्जा मिळत असल्याने या विचारांच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. हा फक्त पक्षप्रवेश नसून विचारसरणीशी नाळ आणखी घट्ट करणारा प्रवास आहे, अशी भावना यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर काम करतांना भेडसावणाऱ्या समस्या आता राज्यस्तरावर मांडण्याची तसेच त्यावर ठोस उपाययोजना करण्याची संधी मिळणार आहे. जनतेचे प्रश्न थेट मा.आठवले साहेबांपर्यंत मांडून त्यांच्या माध्यमातून त्यांना धोरणात्मक स्वरूप देण्यावर भर राहील, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.
केवळ एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन काम करण्याची प्रेरणा मा.आठवले साहेबांच्या व्यक्तिमत्वातून मिळते. महिला, युवक, शेतकरी आणि शहरी गरीब यांच्यासह ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या धोरणानुसार राज्यात पक्ष संघटन आणखी बळकट करणार आहे, असा विश्वास यावेळी डॉ.चलवादी यांनी दिला. आरपीआय (आ) ही बहुजनांच्या हक्कासाठी लढणारे मजबूत विचारपीठ आहे. या विचारपीठावरून अधिक प्रभावी काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे पुणे आणि परिसरातील बहुजन चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


























