सोलापूर – शहरात राहणाऱ्या दोन मुले असणाऱ्या एका सुशिक्षित महिलेला सोलापुरात प्लॉट घेऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांचे कडून सुमारे १५ तोळे सोने आणि रु.१,२०,०००/- रोख रक्कम घेऊन तिची फसवणूक केली. तसेच त्या महिलेस आळंदी येथे एका लॉजवर नेऊन तिला खोटे बोलून व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने तिच्याबरोबर विवाह केल्याच्या गुन्ह्यातील अटकेतील आरोपी राज उर्फ शैलेंद्र महेंद्र गोसावी (वय -३६ वर्षे, रा. अवंतीनगर, सोलापूर) याची जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.एस.बी.नवले यांनी दिला.
याची हकीगत अशी की, आरोपी राज गोसावी याची त्या सुशिक्षित महिलेबरोबर जानेवारी २०२५ला ओळख झाली होती. त्या महिलेस सोलापूर शहरात प्लॉट घेऊन देण्याचे आमिष दाखवून राज याने तिच्याकडून मार्च २०२५ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुमारे १५ तोळे सोने आणि रोख रक्कम रु.१,२०,०००/- मिळवले. त्यानंतर त्याने त्या महिलेस आळंदी येथील एका लॉजवर नेऊन तिचेशी खोटे बोलून व जीवे ठार
मारण्याची धमकी देऊन ११ नोव्हेंबर २०२५ रोजी जबरदस्तीने लग्न केले व त्यानंतरही १९ नोव्हेंबर रोजी राज याच्या पत्नी आणि आईने त्या महिलेस काठीने व हाताने चक्कर येईपर्यंत मारहाण केली. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी त्या महिलेस सिद्धेश्वर मंदिर परिसरात बोलवून आरोपी राज व त्याच्या नातेवाईकांनी तिला शिवीगाळ, मारहाण करून विनयभंग केला आणि सिद्धेश्वर तलावात उडी मारण्यास प्रवृत्त केले वगैरे आशयाची फिर्याद त्या महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक आर.एन.जेऊघाले यांनी आरोपी राज गोसावी यास ७ जानेवारी २०२५ रोजी अटक केली होती.
आरोपी राज गोसावी याच्या जामीन अर्जा प्रकरणी फिर्यादी महिलेने तिचे प्रतिज्ञापत्र देऊन आरोपीस जामीनावर सोडण्यास सक्त विरोध केला होता. तथापि फिर्यादी महिला आणि आरोपीच्या प्रेम संबंधात आरोपीने तिला झिडकारल्यामुळे चिडून बनावट कथा रचून महिलेने खोटी फिर्याद दिली असल्यामुळे गुन्ह्यात तथ्य नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील आल्हाद अंदोरे यांनी करून आरोपीस जामीन मंजूर करण्याची मागणी केली. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन मंजूर केला.
या गाजत असलेल्या गुन्ह्याचे कामी आरोपीतर्फे अॅड.आल्हाद अंदोरे, अॅड.अथर्व अंदोरे तर सरकार पक्षातर्फे अॅड.शिल्पा बनसोडे हे काम पाहत आहेत.





















