देगलूर – डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियामुळे संवाद सुलभ झाला असला, तरी मोबाईलचा अतिरेकी वापर तरुण पिढीसमोर अनेक सामाजिक व मानसिक समस्या उभ्या करीत आहे. त्यामुळे युवकांनी मोबाईलचा सकारात्मक आणि योग्य वापर करणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व लोकगायक नारायण पूरी यांनी व्यक्त केले. आज स्त्रीयांच्या आयुष्यातून जाते निघून गेले, परंतु जात्यावरच्या ओव्यांनी मात्र मराठी कवितेचा श्वास जिवंत ठेवला आहे. जात्याभोवती गायले जाणाऱ्या ओव्यांचा मराठी साहित्याला समृद्ध केले आहे, असे वक्तव्य सुप्रसिद्ध कवी नारायण पूरी यांनी केले आहे. ते देगलूर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्राला संत, थोर साहित्यिक व कवींचा समृद्ध वारसा लाभलेला असून, या मातीतील महिलांनी जात्यावरच्या ओव्या गाऊन मराठी साहित्य वैभवसंपन्न केले आहे. आई, आत्या, काकू, आजी यांच्याकडून जाते फिरवताना गायल्या जाणाऱ्या ओव्यांमधून जीवनानुभव, संस्कृती व संवेदना व्यक्त होत असत; मात्र आज या ओव्या हळूहळू लुप्त होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मराठी लोकसाहित्य जतन करण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन उपस्थित होते. तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार, देवेंद्र बालाजीराव मोतेवार, गंगाधरराव जोशी, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, रविंद्र अप्पा द्याडे, विजय उनग्रतवार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. सोमनाथ पवार व प्रकाश सोनकांबळे यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्रा. डॉ. संजय पाटील यांनी शैक्षणिक, क्रीडाविषयक व संशोधनात्मक कार्याचा सविस्तर अहवाल वाचन केला. यावेळी गंगाधरराव जोशी यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार यांनी वार्षिक स्नेहसंमेलन हा प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील अविस्मरणीय काळ असून, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांतून सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, डॉ. व्ही. जी. शेरीकर, पर्यवेक्षक संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी केले तर आभार प्रा. संग्राम पाटील यांनी मानले.
आनंदनगरी महोत्सवातून ६५ हजार रुपयांची विक्रमी उलाढाल
दरम्यान सकाळी १० वाजता देगलूर महाविद्यालयात ‘आनंदनगरी महोत्सवाचे’ उद्घाटन विभागीय शिक्षण सहाय्यक उपसंचालक (लातूर) श्री. पंचगले यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात तब्बल ३५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते. गुलाबजामून, जिलेबी, पावभाजी, पाणीपुरी, समोसा, कचोरी, पेस्ट्री, लाडू, इडली, दहीवडा, मेंदूवडा, खिचडी, चाट प्रकार, फळे व विविध पदार्थांना मोठी मागणी होती. या महोत्सवातून सुमारे ६५ हजार रुपयांची विक्रमी विक्री झाली. स्टॉलवर खरेदीसाठी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. या आनंदनगरी महोत्सवाचे यशस्वी संयोजन डॉ. एस. व्ही. येरावार यांनी केले.

















