सोलापूर – तांडे, वाड्या व वस्त्यांमध्ये वास्तव्य करत भारतभर भटकंती करीत जीवन जगणाऱ्या बंजारा समाजाला संघटित करण्यासाठी स्व. वसंतराव नाईक यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची स्थापना केली. त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक तांड्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार असल्याचे आॅल इंडीया बंजारा सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी दैनिक तरूण भारतशी बोलताना सांगितले. यावेळी आरके फाउंडेशनचे सावन चव्हाण, श्रीमंत पवार,प्रेम राठोड, विठ्ठल राठोड यांच्यासह बंजारा समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी राठोड पुढे म्हणाले कि, बंजारा समाज हा भटका आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे तांड्यांचा विकास होत आहे. मात्र आजही समाजातील तरूण उच्च शिक्षण घेऊन नोकरीपासून वंचित आहेत. अशा तरूणांना उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी विविध योजनांद्वारे कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंद्रूप सेवालाल नगर तांड्याची आदर्श तांडा म्हणून परिचय असून जिल्ह्यातील इतर तांड्यांमध्येही शासनाच्या योजना पोहोचवून बंजारा समाज बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणणार आहे.
तसेच जिल्ह्यातील अनेक गावात विखुरलेल्या समाजाला एकत्रित करून समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत सर्वच पक्षांकडून बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोतीलाल राठोड यांनी सांगितले.


























