महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन. पत्रकारांना गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
पुण्यात नवी दिशा देणारा प्रकल्प उभारला जात असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील इतर शहरात असे प्रकल्प होतांना पहायला मिळतील.पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाही. त्यामुळे मोहिम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे ही महत्वाची बाब आहे. माध्यमे स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष राहण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेल, असे ते म्हणाले.