सोलापूर – ढोल ताशांच्या गजरात भाजपचे झेंडे फडकावत ‘भारतमाता की जय’ च्या जयघोषात भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक सात मध्ये मंगळवारी प्रचाराचा समारोप केला.
पत्रा तालीम येथून या पदयात्रेस प्रारंभ झाला. तेथून ही पदयात्रा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, धरमशी लाईन, लोभा मास्तर चाळ, निर्मल नगर, ११७ उमा नगरी, लोकमंगल ऑक्सीपार्क, १०५ उमा नगरी, सिद्धीजिन सोसायटी, जुनी पोलीस लाईन, हिरज नाका मार्गे सुशील रसिक सभागृहात विसर्जित झाली.
भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार आनंद कोलारकर, श्रद्धा पवार, उत्तरा बचुटे – बरडे, पद्माकर काळे यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकाससाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी प्रभाग क्रमांक सात मधील मतदारांनी भाजपच्या उमेदवारांचे पुष्पहार घालून, फटाक्यांच्या माळा उडवून, रांगोळ्या घालून स्वागत केले. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधील मतदार भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी ठामपणे उभे राहून चारही उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास मतदारांनी उमेदवारांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, पुरुषोत्तम बरडे, निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे, सुरज बंडगर, जयवंत सलगर, महेश बोकन, सतीश कुदळे, शेखर फंड, विनोद मोटे, दादा सुरवसे, संदिप जाधव आदींसह कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















