काँग्रेसपाठोपाठ आता भाजपानेही काही राज्यांमध्ये आपले राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेकांची राज्यसभेसाठी वर्णी लागली आहे.मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा यांसह महाराष्ट्रातूनही राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
गुजरातमधून जगतप्रकाश नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि जशवंतसिंह सलामसिंह परमार अशा चौघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशमधून डॉ. एल. मुरुगन, उमेशनाथ महाराज, माया नरोलिया आणि बंसीलाल गुर्जर यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे अशो चव्हाण, नांदेडचे डॉ. अजित गोपछडे आणि पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर ओडिशामधून अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. राजस्थान येथून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.