सोलापूर – प्रभाग क्रमांक १३ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, सुनिता कामठी आणि अंबिका चौगुले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली. पंचमुखी हनुमान मंदिर येथून ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रेस सुरुवात होऊन सत्यम हॉटेल, गीता नगर, श्रीकृष्ण मंगल कार्यालय, एकता नगर, चिल्ड्रन पार्क, मार्कंडेय वसाहत, महालक्ष्मी मंदिर, क्रांती झोपडपट्टी व श्रीकृष्ण मंदिर परिसरात समारोप झाला. फटाक्यांची आतषबाजी व भगव्या झेंड्यांमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला.
विकासाच्या मुद्द्यावर भाजपाच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. या पदयात्रेत माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, शंकर चौगुले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


















