सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका हे या भाजप पक्षाचे धोरण आहे. या शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर रविवारी सोलापुरात हल्लाबोल केला. भाजपकडे मनी, मसल पॉवर आहे, पण शिवसेना मेंटल पॉवरने भाजपला लढा देणार, असेही त्या म्हणाल्या.
प्रा. सुषमा अंधारे यांच्याकडे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी नुकतीच सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्या प्रथमच सोलापुरात आल्यावर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, जनता भाजपकडे लोकाभिमुख राजकारण करणारा पक्ष म्हणून पाहत नाही तर हा पक्ष निवडणूक यंत्रणा मॅनेज करणारा, साम-दाम-दंड-भेद,कपटनीती, अन्य पक्षातील नेते,कार्यकर्त्यांची पळवापळवी करणारा पक्ष म्हणून पाहते. वापरा आणि फेका हे या पक्षाचे धोरण आहे. गत दोन वर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील अनेक प्रकरणे बाहेर काढण्यात आली आहेत. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे या मंत्र्यांची घेतलेली विकेट, संजय शिरसाट, संदिपान भुमरे यांची प्रकरणे, रामदास कदम यांच्या पत्नीच्या डान्सबारचे प्रकरण, भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा या गोष्टी वापरा आणि फेकाचे निदर्शक आहेत, असे अंधारे म्हणाल्या.
भाजपचे नेते अमित शहा यांनी शतप्रतिशत भाजपकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगत सन 2029 च्या निवडणुकीत कोणाच्या कुबड्यांची गरज भासणार नाही, असे विधान केले आहे. शहा यांच्यात दर्प खूप आहे, पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरांनी हा दर्प पार चक्काचूर केला आहे. काही झाले तरी भाजपला कुबड्यांची गरज भासणारच आहे, असेही अंधारे यांनी सांगितले.
या निवडणुकीत बार्शी येथे शिवसेनेच्या आमदाराकडून बार्शी पॅटर्न राबविला जात आहे, याबाबत पत्रकारांनी विचारले असता अंधारे म्हणाल्या की, बार्शी पॅटर्नचा निर्णय बार्शीच्या आमदारांनी स्वविवेकाला अनुसरून घेतला आहे, तो पक्ष संघटनेचा निर्णय नाही. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख हे आमदारांशी बोलतील. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोलापुरात शिवसेना करमाळा, माढा, सांगोला आदी ठिकाणी चांगली लढत देत आहे. या निवडणुकीसाठी आम्हाला सात दिवस शिल्लक आहेत. या काळात निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवणार आहोत. यापुढील काळात मी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. विरोधी पक्षांच्या पेन ड्राईव्ह, सीडी, झेरॉक्स कॉप्या आपल्याकडे आहेत, असे सांगत सुषमा अंधारे यांनी भावी काळात ते ओपन करण्याचे संकेत दिले.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र हिरवेगार करू, असे विधान केल्यावर भाजपने प्रत्युत्तरदाखल सात पिढ्या गेल्या तरी ते शक्य होणार नाही असे म्हटले आहे. याबाबत पत्रकारांनी अंधारे यांना विचारले असतात्या म्हणाल्या की, भाजप व एमआयएममध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. भाजपने नुरा कुस्ती खेळलीच पाहिजे. अचलपूर, अमरावतीमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली आहे. हे लक्षात घेता भाजपच्या झेंड्यातील भगव्या व हिरव्या रंगापैकी हिरवा रंग म्हणजे एमआयएम का तसेच भाजपच्या भगव्या कमळाखाली असलेला हिरवा देठ म्हणजे एमआयएम का? याचे उत्तर भाजपने द्यावे.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख अजय दासरी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

























