सोलापूर : महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या रंजीता चाकोते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे ही निवड बिनविरोध होणार आहे. शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी होणाऱ्या सभापती निवडीच्या सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ४९ व्या सभापतीपदी त्या विराजमान होणार आहेत.
महापालिका स्थायी समिती चेअरमन पदाची निवड येत्या शुक्रवार दि. ६ मार्च रोजी होणार असून तब्बल आठ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर महापालिकेला आता स्थायी समितीचा चेअरमन मिळणार आहे. यासाठी बुधवार दि. ४ मार्च २०२६ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. पुणे विभागीय आयुक्तांनी स्थायी समिती चेअरमन निवडीचे वेळापत्रक महापालिकेला कळवले. त्यानुसार ४ मार्च रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. यावेळी भाजपच्या वतीने रंजिता चाकोते यांनी महापालिका नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे अर्ज दाखल केला. या प्रक्रियेसाठी लिपिक कृष्णा जमुल आणि नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले.
भाजपच्या चाकोते यांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. सकाळी ११.४४ वाजता त्यांनी पहिला अर्ज दाखल केला. या अर्जावर सूचक म्हणून जयकुमार माने तर अनुमोदक म्हणून राजू पाटील हे आहेत. तर सकाळी ११.४५ वाजता दाखल केलेल्या दुसऱ्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून अविनाश पाटील तर अनुमोदक म्हणून बिज्जू प्रधाने हे आहेत. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या उपस्थितीत नगरसेविका रंजीता चाकोते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक राजकुमार पाटील,नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक जयकुमार माने, नगरसेवक रुद्रेश बोरामणी, नगरसेवक बिज्जू प्रधाने उपस्थित होते. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नगरसेविका रंजीता चाकोते यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक होईल. या बैठकीत चेअरमनपदाची निवड करण्यात येणार आहे. चाकोते यांचा एकमेव अर्ज असल्याने छाननीनंतर बिनविरोध निवडीची घोषणा होईल. महापालिका सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली होती. एकुण १६ सदस्यांची निवड झाली. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे १४ तर एमआयएम आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विरोधी पक्षांना सूचक अनुमोदक असे दोन सदस्य उपलब्ध नसल्याने साहजिकच त्यांना अर्ज भरता येत नव्हता. यामुळे केवळ भाजपच्या चाकोते यांचा अर्ज दाखल झाला आहे.
हे आहेत स्थायी समितीचे १६ सदस्य
सत्ताधारी भाजपच्या १४ जणांपैकी चाकोते यांना चेअरमन पदाची संधी मिळाली आहे. भाजपचे अविनाश पाटील, सतीश सिरसीला, रंजीता चाकोते, गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजकुमार पाटील, अमर पुदाले तर एमआयएमचे अझहर हुंडेकरी आणि शिवसेनेचे अमोल शिंदे आदी स्थायी समिती सदस्य आहेत.
पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविणार : चाकोते
भाजपा पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी सोपवली आहे. तो विश्वास मी चागली कामे करून सार्थ ठरविणार आहे. सभापती पदाची जबाबदारी पार पाडत असताना विकासकामे प्रामुख्याने व्हावी. निधी आणि आर्थिक नियोजन केले जाईल. आर्थिक आखणी करताना खर्चावर नियंत्रण असावे. जनतेची अपेक्षापूर्ती करण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना सभापतीपदाच्या उमेदवार रंजीता चाकोते यांनी व्यक्त केली.
प्रदेश श्रेष्ठींकडे चार नावे पाठविली होती : काळे
भाजपच्या प्रदेश श्रेष्ठींकडे स्थायी समिती सभापती पदासाठी चार जणांची नावे पाठविण्यात आली होती. त्यापैकी आज प्रदेशने रंजीता चाकोते त्यांचे नाव निश्चित केले आहे. येत्या 6 मार्च रोजी सभापती पदाची निवड होणार आहे. महापालिकेच्या पुढील सभेत राहिलेला एक स्वीकत सदस्यही जाहीर करण्यात येणार आहे, असे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.


























