तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : शहर वाहतूक शाखेच्यावतीने जप्त करण्यात आलेल्या 525 सायलेन्सवर बुलडोझर फिरवला. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. नागरिकांकडून आणि विशेषतः तरुण मुलांमध्ये बुलेट सारखी दुचाकी वाहन वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सदर वाहनांना माँडीफाईट सायलेन्सर बसवून अशी दुचाकी वाहने मोठ्याने सायलेन्सरचा आवाज करीत मिरवणुकीमध्ये अथवा कॉलेज समोरुन जाण्याचे तक्रारी वारंवार वरीष्ठांना प्राप्त झाले होते.
या अनुषंगाने पोलीस आयुक्त एम राज कुमार यांचे निर्देशानुसार पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात बुलेट सायलेन्सर व मॉडीफाईड सायलेन्सर बाबत दैनंदिन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
मोहिमदरम्यान शहर वाहतुक शाखा (दक्षिण विभाग) चे पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे यांचे पथकाने अशा मॉडीफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करुन एकूण ४१० सायलेन्सर जप्त करण्यात आले होते, तसेच शहर वाहतुक शाखा (उत्तर विभाग) चे पोलीस निरीक्षक सुरज चाटे यांचे पथकाने कारवाई करीता एकूण ११५ सायलेन्सर जप्त करण्यात आले होते,
शहर वाहतूक शाखेने सर्व जप्त एकुण ५२५ सायलेन्सरचा बुलडोजरने नाश करण्यात आले. तसेच याप्रसंगी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन यांनी सोलापूर शहरातील जनतेला वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले व भविष्यात अशाप्रकारे बुलेट सायलेन्सर, मॉडीफाईड सायलेन्सर, ऑटो रिक्षा चालकांकडून वारंवार होणाऱ्या वाहतुक उल्लंघनावर देखील विशेष मोहिम मोठ्या प्रमाणात राबविले जाणार असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर शहराची वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक व वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मोहिम शहरात दैनंदिन सुरु राहील अशी माहिती त्यांच्या वतीने याप्रसंगी देण्यात आली.