नव्वदच्या दशकात सोलापुरातील मोठमोठ्या सूतगिरण्या एकापाठोपाठ बंद पडल्यानंतर देशोधडीला लागणाऱ्या गिरणी कामगारांना सोबत घेत डफरीन चौकातील हॉटेल उपहारगृह चालवायला घेत ‘अनादी केटरर्स’ हा ब्रॅण्ड विकसित करणारे सोलापूरच्या केटरिंग व्यवसायाला ‘प्रतिष्ठा’ मिळवून देणारे नागेश निळकंठ सहस्त्रबुद्धे यांचे वैष्णोदेवी दर्शनाला गेल्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे वृत्त समजले. एक कौटुंबिक स्नेही म्हणून त्यांच्या संघर्षाचा प्रवास मांडून त्यांच्याप्रती शब्द सुमनांजली वाहण्याचा हा अल्प प्रयत्न.


गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहराचे अर्थकारण गडबडले ते नव्वदीच्या दशकात. मोठमोठ्या सूतगिरण्या एकापाठोपाठ बंद पडल्याने मिलमध्ये काम करणारे कामगार मोठ्यासंख्येने बेरोजगार झाले. याबरोबरच अवलंबित असलेले छोटे-मोठे उद्योगही अडचणीत येवून शहराला बकालपणा आला. याचवेळी स्वतः मिलमध्ये कर्मचारी म्हणून सेवा बजावलेल्या नागेश निळकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मिल कामगारांना सोबत घेऊन डफरीन चौकातील हॉटेल उपहार चालवायला घेतले. बेरोजगार झालेल्या अनेक कुटुंबांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या नागेश सहस्त्रबुद्धे यांनी ‘अनादी केटरर्स’ या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. तितक्याच तन्मयतेने ‘अनादी’चा व्यवसाय सचोटीने करीत त्यांनी केटरिंगच्या व्यवसायात ‘अनादी’ला विश्वासाचा ब्रँड बनवला आहे.
नागेश निळकंठ सहस्त्रबुद्धे हे मूळचे करकंब (ता-पंढरपूर) इथले. दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते १९७२ च्या सुमारास सोलापुरात आले. संगमेश्वर महाविद्यालयातून १९७७ मध्ये वाणिज्य शाखेची पदवी त्यांनी संपादन केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी एका मंगलकार्यालयात वाढपी, मदतनीस म्हणून कामही केले. पुढे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये अकाऊंट विभागात नोकरीस लागले.
याचकाळात १९९१ मध्ये त्यांनी केटरिंगची कामे घ्यायला सुरुवात केली होती. मिलमधील गरजू आणि केटरिंगच्या कामाची आवड असलेल्या कामगारांना सोबत घेऊन मंगलकार्याच्या केटरिंगच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. नोकरी सांभाळून करत सुरू केलेल्या या केटरिंगच्या व्यवसायात सुरुवातीला त्यांच्यासोबत तीन भागीदार होते. कालांतराने केटरिंग व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी नागेश सहस्त्रबुद्धे यांच्यावर आली.
लक्ष्मी-विष्णू मिलची एकूणच परिस्थिती डळमळीत अवस्थेत पोहोचली होती. याचकाळात म्हणजेच १९९४ मध्ये नागेश सहस्त्रबुद्धे यांनी पार्क चौकात एक छोटा दुकानगाळा भाड्याने घेवून अनादी पोळीभाजी सेंटर सुरू केले. स्वस्तात तयार गरम गरम पोळीभाजी मिळण्याचे त्यावेळी हे एकमेव केंद्र होते. स्वच्छता, खाद्यपदार्थाची गुणवत्ता आणि ग्राहकांना मिळणाऱ्या अ आगत्यपूर्ण सेवेमुळे अल्पावधीतच अनादी पोळीभाजी सेंटर ग्राहकांच्या जिभेवर रुळले. सोलापुरात नियमित कामानिमित्त येणाऱ्या बाहेरगावच्या लोकांबरोबरच शहरातील ग्राहकांनी देखील पार्सलसेवेकडे आपले लक्ष वळविले. ताजे, घरगुती चवीचे पण गुणवत्तापूर्ण भोजन म्हणून अनादीच्या पोलीभाजीकडे पाहिले जावू लागले.
सुरुवातीला पार्सलसेवा देतानाच बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांची सोय व्हावी म्हणून मोठी जागा शोधताना डफरीन चौकातील उपहार हे बंद झालेले हॉटेल ताब्यात घेऊन नागेश सहस्त्रबुद्धे यांनी तिथे अनादी केटरर्स सुरू केले. विशेष म्हणजे याठिकाणी लक्ष्मी-विष्णू मिलमधून बेरोजगार झालेल्या गरजू कामगारांना नोकरी देण्याकडे त्यांनी सुरुवातीपासून कटाक्ष ठेवला. व्यवसायाला गती मिळाली तसे त्यांनी रेल्वे लाईन्स भागात आणि विजापूररोड परिसरात अनादी केटरर्सच्या शाखा सुरू केल्या.
नागेश सहस्त्रबुद्धे म्हणजे प्रचंड हिशोबी माणूस अशी त्यांची प्रसिद्धी आहे. दररोज व्यवसायातील खतावण्या न कंटाळता लिहणे, चोख हिशोब ठेवणे हा त्यांच्या शिस्तीचा एक भाग बनलेला आहे. आजही रोजनिशी आणि खतावणी लिहण्यात त्यांचा खंड पडलेला नाही.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मंगलकार्यालयात वाढपीचे काम केलेले नागेश सहस्त्रबुद्धे अगदी सहजतेने ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे सेवा पुरवित. पडेल ते काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे अनादी मध्ये काम करणाऱ्या स्टाफला देखील हीच शिकवण त्यांनी दिली आहे.
लक्ष्मी-विष्णू मिल बंद झाली तेंव्हा मिलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकावर आभाळ कोसळले होते. अधिकारी पदावर काम करणाऱ्यांना काही हालचाल करून दुसरीकडे काम देखील मिळाले होते. मात्र कामगार असलेल्यांचे खूप हाल सुरू झाले होते. मात्र मिल बंद पडणे ही घटना नागेश सहस्त्रबुद्धे यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी देणारी अशीच घटना ठरली होती. नव्या ठिकाणी नोकरीसाठी ते मुलाखतीला गेले. त्यावेळी त्यांना नोकरी ऐवजी तुम्ही व्यवसाय का करत नाही ? असा सल्ला त्यांना मिळाला. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहणाऱ्या नागेश सहस्त्रबुद्धे यांनी त्याचवेळी केटरिंगचा व्यवसाय वाढविण्याचा निश्चय केला.
मिल कर्मचारी ते यशस्वी व्यावसायिक हा प्रवास अतिशय सचोटीने करत असताना नागेश सहस्त्रबुद्धे यांनी कौटुंबिक पातळीवरची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. मिलमध्ये नोकरीस असतानाच १९८१ मध्ये त्यांचे रोहिणी बल्लाळ दाते (पूर्वाश्रमीचे नाव) यांच्याशी लग्न झाले. दाते पंचांगकर्ते हे सोलापुरात मोठा नावलौकिक कमावलेले घराणे. मात्र बल्लाळ दाते यांनी कष्ट करणारा, निर्व्यसनी आणि समंजस म्हणून पारख करीत नागेश यांना आपली कन्या दिली. लग्न झाले त्यावेळी सौ. रोहिणी ह्या बीएस्सी (केमिस्ट्री) मध्ये द्वितीय वर्षात शिकत होत्या. लग्नानंतर नागेश यांनी सौ. रोहिणी यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. घरात पाच सख्ख्या बहिणी आणि कमावते एकटे नागेश असतांनाही अतिशय काटकसरीने आणि न बोलता त्यांनी जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. पती नागेश यांच्या प्रोत्साहनामुळेच सौ. रोहिणीताई यांनी बीएस्सी (केमिस्ट्री), बीएस्सी (झुलॉजी), संगीत विशारद, बीपीएड, एमए (मराठी), एमए (किर्तनशास्त्र) ह्या पदव्या संपादन केल्या. शिक्षिकेची नोकरी करीत मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सौ. रोहिणीताई ह्या कौटुंबिक पातळीवर आणि व्यवसायातही नागेश यांच्या सोबत खंबीरपणे उभारल्या. महिन्यात जवळपास वीस दिवस केटरिंगची कामे असायची.
त्यावेळी सुरुवातीला घरूनच सर्व भाज्या बनवून दिल्या जायच्या. याबरोबरच नोकरी सांभाळत रोहिणीताई यांनी अनादीचे काऊंटर देखील सांभाळायची जबाबदारी पेलली. यासर्व आघाड्यांवर लढत असतांना सहस्त्रबुद्धे दाम्पत्याने मुलगा अनीश आणि मुलगी अमृता यांचे चांगले संगोपन करीत त्यांना उच्चशिक्षित बनवले.
मुलगा अनीश सहस्त्रबुद्धे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच असून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी संपादन केल्यानंतर त्याने पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करीत अनुभव संपादित केला. घरच्याच व्यवसायात हातभार लावण्यासाठी सोलापुरात आल्यावर अनादी केटरर्स बरोबरच अनीशने ‘स्पाईस अँड आईस’ ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करून नावारूपाला आणली. आज तो इव्हेंट मॅनेजमेंट बरोबरच कार्पोरेट ट्रेनर, व्यावसायिक मार्गदर्शन करणारा मॅनेजमेंट गुरू अश्या चतुरस्त्र भूमिकेत यशस्वी घौडदौड करीत आहे. त्याला त्याची पत्नी सौ.मनाली हिची साथ आहे. मुलगी अमृता हिचा विवाह पुण्याचे निलेश जोशी यांच्याशी झाला असून जावई निलेश हे परसिस्टन्स कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
आईबाप म्हणून सर्व कर्तव्ये समर्थपणे पार पाडणारे नागेश सहस्त्रबुद्धे आणि सौ. रोहिणीताई सहस्त्रबुद्धे आजही अनादी केटरर्सच्या माध्यमातून अनेक गरजूंचे आईबाप म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात . वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या नागेशजी सहस्त्रबुद्धे यांना वैष्णोदेवीनेच आपल्याकडे बोलावून घेतले. शेवटी काळापुढे आपण सर्वच निरुत्तर असतो….!
:- मुकुंद मधुकर हिंगणे.