जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर आज, गुरुवारी सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने जम्मू-काश्मिरातील किरू जलविद्युत प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई केली आहे. यापूर्वी सीबीआयने विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई केली होती.
सीबीआयने देशभरात 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे मारण्यात आलेत. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा आणि मुंबई इथे या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी हे छापे मारण्यात आलेत. किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप मलिक यांनी केला होता. किरू जलविद्युत परियोजना (624 मेगावाट), एक रन-ऑफ-रिवर योजना, जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. प्रकल्पामध्ये प्रत्येकी 156 मेगावॅट क्षमतेच्या 4 युनिट्ससह 135 मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.
दरम्यान, किरू हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट कॉन्ट्रैक्ट संदर्भात सीबीआयने छापा मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सत्यपाल मलिक यांच्या घर आणि कार्यालयात सीबीआयने छापेमारी केली होती. सीबीआयने मे 2023 मध्ये 12 ठिकाणी छापेमारी केली होती. सीबीआयने त्यावेळी सौनक बाली यांच्या घरी छापेमारी केली होती. बाली हे सत्यपाल मलिक यांचे माध्यम सल्लागार राहिले आहेत. आता सीबीआयनं किरू हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट संदर्भात 30 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये सत्यपाल मलिक यांच्या घराचा आणि कार्यालयाचा समावेश आहे.