सोलापूर – जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सोहळा पार पडताना केवळ सत्तास्थापनेपुरता मर्यादित न राहता एक वेगळाच “खुर्चीचा किस्सा” चर्चेचा विषय ठरला.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सचिन कल्याणशेट्टी यशवंतराव सभागृहात दाखल होताच सर्वजण बसले; मात्र नूतन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे मागे उभे असल्याचे कल्याणशेट्टी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ स्वतः उठून आपली खुर्ची उपाध्यक्षांना दिली. त्यानंतर राम सातपुते यांनीही पुढाकार घेत स्वतःची खुर्ची देत साध्या खुर्चीवर स्थान घेतले.
आ.सचिन कल्याणशेट्टी यांची बारकाई कायम राहिली. भाषणादरम्यान त्यांनी युवा नेते मनीष देशमुख उभे असल्याचे पाहताच तातडीने त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांकडून खुर्ची मागवून देशमुख यांना बसण्याची सोय केली. मात्र ज्येष्ठ नेते शहाजी पवार यांच्यासाठी खुर्ची उपलब्ध नसल्याचे पाहून कल्याणशेट्टी यांना खंत वाटल्याचेही दिसून आले. या संपूर्ण प्रसंगाने सत्तेच्या गदारोळातही मानवी संवेदनशीलता आणि साधेपणाचे दर्शन घडवत “खुर्चीचा किस्सा” सोलापूर झेडपीच्या सभागृहात विशेष ठरला. सभागृहात सुरुवातीला माजी आमदार राजन पाटील आणि दीपक साळुंखे शेवटच्या खुर्चीवर बसले होते. “पुन्हा कोपऱ्यात जाऊ नये म्हणून खुर्ची सरकत सरकत बाहेर निघू,” अशी हलकीफुलकी टिप्पणी करत राजन पाटील यांनी वातावरणात हशा पिकवला.
दरम्यान, याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे सभागृहातील सर्वांचीच मने जिंकली. जिल्हा परिषदेत प्रथमच पूर्ण बहुमतासह भारतीय जनता पक्ष सत्तेत आला असून पक्षाचा पहिला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला गेला. या ऐतिहासिक क्षणी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, दीपक साळुंखे, प्रदेश नेते शहाजी पवार, युवा नेते मनीष देशमुख, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
























