पंढरपूर – आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणावर भरतात. त्यापैकी माघी यात्रा सध्या संपन्न होत असून, या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी निगडित असलेल्या प्राचीन परंपरांचे कटाक्षाने पालन करण्यात येत आहे.
माघ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प. औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची पारंपरिक परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री विठ्ठल सभामंडप येथे चक्रीभजन भक्तिभावाने संपन्न झाले.
सदर चक्रीभजन सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी सादर केले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक संदेश भोसले, विभाग प्रमुख संजय कोकीळ, राजेंद्र सुभेदार, राजेश पिटले, अतुल बक्षी, राजेंद्र घागरे, राजाराम ढगे, सावता हजारे, शंकर मदने l तसेच सुमारे एक हजार ते दीड हजार भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शके १७१८ पासून चक्रीभजनाची परंपरा देगुलर येथील गुरुगुंडा महाराजांकडून संस्थानचे मूळ पुरुष सद्गुरू विरनाथ महाराज यांना प्राप्त झाली आहे. चक्रीभजन म्हणजे संसाराच्या चक्रातून व भयातून मुक्त करणारे भजन असून, या भजनामध्ये काही भाविक बसून तर काही उभे राहून नृत्यात्मक पद्धतीने भजन करतात. या भजनातून देहाची विदेही अवस्था प्राप्त होत असल्याची अनुभूती मिळते.
औसेकर घराण्याकडून सन १७९२ पासून माघ वारी काळात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्रीभजनाची अखंड परंपरा जोपासली जात आहे. चक्रीभजनामध्ये एकूण १४ भजने सादर केली जातात. या भजनातून वारकरी संप्रदाय पूर्णतः भक्तिरसात रंगून जातो, असे औसा संस्थानचे अध्यक्ष तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
दरम्यान, श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिरात होणारे विविध मोठे धार्मिक सोहळे व कार्यक्रम समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येत आहेत. त्यानुसार सदर चक्रीभजन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच युट्युब व फेसबुक या समाज माध्यमांवर करण्यात आले. यामुळे हजारो भाविकांनी घरबसल्या या भक्तीमय सोहळ्याचा आनंद घेतला.


























