सोलापूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची दुरुस्ती तसेच पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप मराठा महासंघाचे दास शेळके यांनी केला आहे. विशेष म्हणजे नियमांपेक्षा जास्त कालावधी लावूनही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला असताना प्रत्यक्षात मात्र काम अपेक्षित दर्जाचे नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे मराठा महासंघाचे म्हणणे आहे. चबुतऱ्याची दुरुस्ती, वापरण्यात आलेली सामग्री तसेच परिसरातील सौंदर्यीकरण अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ व स्वतंत्र संस्थेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही, तसेच सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
























