नांदेड – स्व.हरिभाऊजी नागतुरे ग्राम विकास बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था वणी व आर्टिस्ट स्पेस नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्र,शिल्प स्पर्धा व प्रदर्शनात माहूर येथील अंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रणजीत दत्त वर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किरणताई संजय देरकर (अध्यक्षा, एकवीरा महिला बँक, मारेगाव) यांच्या हस्ते कला सन्मान या पुरस्काराने सन्मानित. आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित अस्सल कलेचे धनी, एक प्रतिभावंत गुणी कलाकार चित्रकार रणजित वर्मा यांचा माहूरच्या कला संस्कृती क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून,सर्वस्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
स्व.हरिभाऊजी नागतुरे ग्राम विकास बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था वणी व आर्टिस्ट स्पेस नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्र,शिल्प स्पर्धा व प्रदर्शन दि.२८ ते ३० ऑक्टोबर २०२५ या दरम्यान लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी जि. यवतमाळ येथे भरविण्यात आले होते. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात माहूर येथील शिक्षक चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांच्या जलरंगातून साकारलेल्या निसर्ग चित्रणास वणी येथील रसिकांनी भरभरून दाद दिली.वर्मा यांचे हे प्रात्यक्षिक वणी येथे दिलेले पहिले प्रात्यक्षिक होते,जे विशेष उल्लेखनिय असे ठरले.प्रात्यक्षिक सादर करताना वर्मा यांनी प्रश्नोत्तरातून विद्यार्थी व रसिकांशी संवाद साधत रसिकांवर आपल्या कलेची अक्षरशा: भुरळ घातली.
बक्षिस वितरण सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमात
चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किरणताई संजय देरकर (अध्यक्षा, एकवीरा महिला बँक, मारेगाव) यांच्या हस्ते कला सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे बक्षिस वितरणामध्ये शिल्प विभागासाठी चित्रकार रणजित वर्मा यांचे वडील दिवंगत पत्रकार तथा चित्रकार दत्त वर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रथम पारितोषिक देऊन कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश नागतुरे अध्यक्ष तथा माजी गटशिक्षणाधिकारी तथा प्रदिप नागतूरे सचिव, प्राचार्य बा. ना. कला महाविद्यालय पुसद यांच्या संकल्पनेतून स्व हरिभाऊजी नागतुरे यांच्या स्मरणार्थ राज्य स्तरीय चित्र , शिल्प प्रदर्शनाच्या आयोजनाने वणी येथील रसिकांना मिळालेली मेजवाणी खरोखरच अविस्मरणीय अशी ठरली असल्याचे मनोगत सौ. किरणताई संजय देरकर यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले. वर्मा यांच्या या दुहेरी यशाबद्दल अशोक सोनटक्के, महादेवराव,गजानन कासावार, हरिदास वनस्कर, विजय गंधेवार,गजानन गोडे, म .प्रा. शिक्षण परिषदेचे तालुकाध्यक्ष शेषराव पाटील,
विक्रांत हटकर,महेश अण्णापुरे,गणेश कुरुडे,सारंग नागठाणे,प्रा.गजानन बोबडे, प्रा.चंद्रशेखर कुमावत, आकाश खोब्रागडे,गणेश नैताम,स्वाती नैताम,अरविंद जाधव यांसह अनेकांनी अभिनंदन करत कला क्षेत्रातील पुढील कार्यास शुभेच्या दिल्या.


















