मंगळवेढा – “एक दिवस गावासाठी” या स्तुत्य मोहिमेअंतर्गत दर शनिवारी मंगळवेढा शहरातील विविध मंदिर किंवा सार्वजनिक परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून शनिवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत दामाजी चौकातील श्री संत दामाजी महाराज पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.दामाजी चौक हा शहरातील वर्दळीचा भाग असल्याने येथे वाहतुकीमुळे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पुतळ्या शेजारील अतिक्रमणे हटविण्यात नगरपालिक अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.
याची दखल घेत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच पाण्याने श्री संत दामाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करून परिसर प्रसन्न करण्यात आला.
या मोहिमेत मंगळवेढा शहरातील जागरूक नागरिक व विविध सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन उपक्रम राबवला जात असून, सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण या माध्यमातून समोर येत आहे. याच परिसरात वाढदिवसानिमित्त झाडांच्या कुंड्या भेट देऊन सुशोभीकरण करण्यात येत असल्याने पर्यावरणपूरक संदेशही दिला जात आहे.मंगळवेढा ही संतांची भूमी असून शहरातील प्रत्येक संतांच्या मंदिर व परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे. यासाठी समस्त मंगळवेढकरांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, स्वच्छता व सामाजिक ऐक्याचा आदर्श मंगळवेढ्यात निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या स्वच्छता मोहिमेत स्वप्निल फुगारे, अंबादास गुंगे, आण्णासाहेब देशमुख, स्वप्निल टेकाळे, सतीश दत्तू यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


























