बिलोली / नांदेड – भविष्यात कृषी सर्वेक्षण आणि मॅपिंग,आपत्ती व्यवस्थापन,संरक्षण, चित्रीकरण, वाहतूक आदी क्षेत्रामध्ये विविध कामांसाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.या क्षेत्रात रोजगाराची असलेली मोठी संधी लक्षात घेऊन ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य प्राप्त करता यावे म्हणून सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या उद्यमिता लर्निंग सेंटरतर्फे ड्रोन प्रशिक्षण केंद्राची(RPTO)सुरुवात करण्यात आली असून गत आठवड्यात या प्रशिक्षण केंद्राची पाहणी मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी करून स्वतः पिकांवर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक ड्रोन हाताळणीचा अनुभव घेतला.
येथील संस्कृती संवर्धन मंडळ व दक्षा अनमॅनड सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, चेन्नई (कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड) यांच्यामध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्या साठी सामंजस्य करार झाला आहे. या प्रशिक्षण केंद्रात विविध कामासाठी उपयुक्त अत्याधुनिक ड्रोन उडविण्याचे सखोल व व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून यामध्ये संगणक-सिम्युलेटर प्रशिक्षण, मूलभूत जोडणी व देखभाल याचेही प्रशिक्षण मिळणार आहे.
याकरिता नागेश गुप्ता व रोहित चौधरी या तज्ञ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर प्रशिक्षणार्थ्यांना १० वर्षासाठी ड्रोन उडविण्यासाठी चा परवाना प्राप्त होईल याचा उपयोग ड्रोन खरेदीसाठी सुद्धा होणार आहे. हे प्रशिक्षण केंद्र भारत सरकार मान्यता प्राप्त (DGCA) असून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे.
या प्रशिक्षण केंद्राची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी, जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराची ही एक सुवर्णसंधी असून तरुणांनी किसान ड्रोन,यांत्रिकीकरण,नमो ड्रोन दिदी,कृषी समृद्धी सारख्या विविध शासकीय योजना चा फायदा घ्यावा असे आवाहन केले त्यांनी जिल्ह्यात अनेक कामासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल याकरिता जिल्हा प्रशासन देखील सहकार्य करेल असे सांगितले.
यावेळी संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, सचिव डॉ. जयंत जकाते, जनसंपर्क अधिकारी अभिजीत महाजन, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, क्रांती डोंबे, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख माधुरी रेवणवार, प्रशिक्षण समन्वयक व्यंकट शिंदे, परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती.


















