नवीन नांदेड – गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी आ.आनंदराव पाटील बोंढारकर यांनी पुढाकार घेतला असून आजपासून दर महिन्याला माॅं गोदावरी जलपूजन आणि गोदावरी शुद्धीकरण अभियान राबविण्यात येणार आहे . या अभियानाची सुरुवात काल करण्यात आली. माॅं गोदावरी सेवा समिती नांदेड चे अध्यक्षा सौ.सरस्वती आनंदराव बोंढारकर यांनी हे पवित्र कार्य हाती घेतले आहे. त्रिकुट येथील श्री गणपती देवस्थान येथे नारळ फोडून आणि पूजा करून या कार्याची सुरुवात करण्यात आली आहे .
नांदेड शहरातून पवित्र गोदावरी नदी वाहते . परंतु गोदावरी नदी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अशुद्ध झाली आहे . नांदेड शहरातील अनेक नाल्यांचे घाण पाणी गोदावरी नदीत सोडले जात असल्याने गोदावरी नदीच्या पवित्रतेला ही बाधा पोहोचली आहे. ही बाब लक्षात घेता आ.आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या सौभाग्यवती सरस्वती बोंढारकर यांनी माॅं गोदावरी सेवा समिती नांदेड च्या माध्यमातून गोदावरी नदीच्या संरक्षणासाठी आणि शुद्धीकरणासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे.
या अभियानाला त्रिकूट येथील श्री गणपती देवस्थाना पासून सुरुवात करण्यात आली. दर महिन्याला हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गोदावरी नदीच्या रक्षणासाठी आणि शुद्धतेसाठी नागरिकांनीही या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन सरस्वती आनंदराव बोंढारकर यांनी केले आहे.

























