जाफराबाद – सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकारांची सामूहिक बदनामी केल्याचा आरोप करत जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशाल पिंपळे (रा. छत्रपती संभाजीनगर) असे तक्रारीतील संबंधित व्यक्तीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी फेसबुकवरील “विशाल पिंपळे” या नावाच्या खात्यावरून एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये “पत्रकार म्हणून विशाल पाटील वाकडे तुमचा अभिमान वाटतो आम्हाला, बाकीचे पत्रकार दलाल विकले गेले काय जाफराबाद” असा उल्लेख करण्यात आला होता. या मजकुरातून जाफराबादसह महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना ‘दलाल’ व ‘विकले गेलेले’ असा अपमानास्पद उल्लेख करून त्यांची सामूहिक बदनामी केल्याचा आरोप पत्रकार संघाने केला आहे.
संबंधित व्यक्ती यापूर्वीही समाजात वाद निर्माण करून सामाजिक वातावरण दूषित करत असल्याचे संघाने नमूद केले आहे. या प्रकारामुळे पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या असून, पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे मत संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर व रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, जाफराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.
यावेळी जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकेश भारद्वाज, मोहन मुळे, प्रकाश मिरगे, शेख अजीम, शेख आयुब, गजानन उदावंत, चेतन बायस, पांडुरंग राऊत, ज्ञानेश्वर पाबळे, विशाल वाकडे, भरत लहाने, प्रल्हाद लोणकर, शेख कदीर, प्रदीप बोबडे, मंगलसिंग भारद्वाज, दिलीप बोबडे,हरी भालके, नितीन राऊत, सलमान पठाण, सचिन चुंगडा, समाधान भोपळे, विनोद फादट, प्रताप भिसे, विनोद वाघ आदी पत्रकारांचा समावेश होता

























