सोलापूर : सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करताना गुणवत्तेवर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेशी संबंधित कामे अत्यंत दर्जेदार व टिकाऊ पद्धतीनेच पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिल्या.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांतील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून काही ठिकाणी ही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही ठिकाणी सध्या प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, सार्वजनिक आरोग्य कार्यकरी अभियंता व्यकटेश चौबे, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, जावेद पानगल यांच्यासह मुख आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थिती होते.
या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी दुरुस्ती पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या सार्वजनिक शौचालयांची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत सविस्तर आढावा घेतला. काम दर्जेदार झाले आहे की निकृष्ट दर्जाचे आहे, वापरात नागरिकांना अडचणी येत आहेत का, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाशव्यवस्था तसेच देखभाल याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी आयुक्तांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांनी काही ठिकाणी झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले, तर काही ठिकाणी अजून सुधारणा आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सूचनांची दखल घेत आयुक्तांनी संबंधित ठेकेदार व विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून सार्वजनिक सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या प्रत्यक्ष पाहणी नियमितपणे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


























