सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सोलापूर येथील आर्ट्स व कॉमर्स विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘Skills for Success in the Digital Age’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयामध्ये पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. डी. एस. सुत्रावे यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांचा सविस्तर आढावा घेतला. डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक व जीवनकौशल्यांचा विकास करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. समारोप समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल मा. श्रीधर रिसबुड हे उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त प्रा.भीमाशंकर शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रिसबूड म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्याधिष्ठित शिक्षण, डिजिटल साक्षरता, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवोन्मेषी दृष्टिकोन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला सतत अद्ययावत ठेवावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेतील अनुभव कथन करत विविध सत्रांमधून मिळालेल्या ज्ञानाचा अभ्यास व करिअरसाठी निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, करिअर नियोजन, उद्योजकता आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवरील सत्रे विशेष उपयुक्त ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून महाविद्यालयाने भविष्याभिमुख उपक्रम राबवावेत, त्यासाठी संस्था कायम पाठिंबा देत राहील असे आश्वासन दिले. तसेच आयोजक, मार्गदर्शक व सहभागी या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. वैशाली वराडे यांनी पोस्टर सादरीकरणात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे यादीवाचन केले. त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात आली.
विद्यापीठाच्या उत्कर्ष उपक्रमात यशस्वी झालेल्या पियुष देडे या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला. कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यशाळेत नरेंद्र गंभीरे, यशवंत शितोळे, सौरभ माळवे, शार्दुल शिरोळकर, चंद्रिका चौहान, उपजिल्हाधिकारी आरती जाधव, दीपक ननवरे, दिलीप पवार, अश्विनी पाटील, विश्वास जाधव यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय कार्यशाळे च्या आयोजनामध्ये महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक प्रा. स्वामी, डॉ. अनमोल वळसंगे प्रा. एम. बी . पाटील डॉ.अनिता बिराजदार , प्रा. अश्विनी बिरोळी ,डॉ. स्मितांजली दामा,प्रा. चिलका, प्रा.शिवानंद घोंगडे ,प्रा.वसंत मणुरे, ,डॉ. महादेव कांबळे प्रा. उमरजकर , डॉ. दामोदर बनसोडे ग्रंथपाल महेश स्वामी यांनी प्रयत्न केले.
कार्यशाळेच्या सह समन्वयक डॉ. शुभदा उपासे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता बावगे व डॉ. स्मितांजली दामा यांनी केले. निवेदिता मधुरे या विद्यार्थिनीने गायलेल्या वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

























