जालना – तालुक्यातील देवमूर्ती येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर शनिवार, दि. ७ रोजी आयोजित करण्यात आले असून या शिबिराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी असिमा मित्तल यांनी देवमूर्ती ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत तयारीचा आढावा घेतला. तसेच या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी असिमा मित्तल यांनी सांगितले की, या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध शासकीय अडचणी व समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
या प्रसंगी तहसीलदार छाया पवार, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.























