सोलापूर : दयानंद शिक्षण संस्थेच्या डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात, सोलापूर येथे “Artificial Intelligence and Career Opportunities” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि भविष्यातील करिअर संधींबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पटेल उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर निलया फाऊंडेशन, पुणे चे श्री. चेतन गोडबोले यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कपिल रंगदळ यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी Artificial Intelligence या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरवर होणारा परिणाम याविषयी प्रस्तावना केली.
प्रमुख वक्ते श्री. चेतन गोडबोले यांनी आपल्या व्याख्यानात Artificial Intelligence चे वाढते महत्त्व, विविध क्षेत्रांमध्ये होणारा त्याचा वापर तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. AI इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग तज्ज्ञ, रोबोटिक्स इंजिनिअर अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून कौशल्ये विकसित केल्यास विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअर घडवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले आणि विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःला तयार ठेवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पटेल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात Artificial Intelligence सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यातील रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नागसेन गवळी यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























