देगलूर – “भिंतीवर स्वच्छता सर्वेक्षणाची ब्रॅण्डिंग, जमिनीवर मात्र घाणीचे साम्राज्य” या मथळ्याखाली दै. तरुण भारतने दि. १८ जानेवारी रोजी बातमी प्रसिद्ध करुन शहरातील स्वच्छतेची विदारक परिस्थिती उघड केली. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने स्वच्छतेला सुरुवात केली. विशेषतः मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्याकडून स्वच्छता निरीक्षकांना सक्त सुचना दिल्याने स्वच्छता निरीक्षक फिल्डवर जाऊन पाहणी करीत असल्याचे दिसून आले आहे.
दै. तरुण भारत वृत्तपत्रातच्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांवर बातम्या प्रकाशित करुन जनतेच्या समस्या निराकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात दि १८ जानेवारी रोजी सुध्दा शहरातील स्वच्छतेसंदर्भात “भिंतीवर स्वच्छता सर्वेक्षणाची ब्रॅण्डिंग, जमिनीवर मात्र घाणीचे साम्राज्य” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीत वास्तव परिस्थितीचे विदारक परिस्थिती सांगितली. यामध्ये प्रशासन, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची भूमिका स्पष्ट केली होती. ही बातमी अखेर प्रशासनाला जागे करणारी ठरली आहे. बातमी प्रसिद्ध होताच नगरपरिषद देगलूर खडबडून जागे झाले आणि भाजी मार्केट परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
नगरेश्वर मंदिराच्या पाठीमागील भाजी मार्केट परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी, उकिरडे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत तरुण भारत ने वास्तवदर्शी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने नगरपरिषदेचे कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि संबंधित विभाग प्रत्यक्ष मैदानात उतरले. संपूर्ण परिसरातील कचरा उचलण्यात आला. विशेषतः मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी स्वच्छतेसंदर्भात स्वच्छता निरीक्षकांना सक्त सुचना दिल्या. विशेष म्हणजे या बातमीच्या परिणामानंतर शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेले स्वच्छता निरीक्षकही अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता निरीक्षकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी सुरू केली असून नियमित स्वच्छता होण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी कामाला गती मिळाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
शहरवासीयांनीही ‘जबाबदारीचा’ हात पुढे करावा !
तथापि, केवळ बातमी आल्यानंतरच स्वच्छता करून थांबणे योग्य नसून ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांबरोबरच शहरातील नागरिकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. कचरा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा बाजारपेठेत टाकू नये, ओला व सुका कचरा वेगळा ठेवावा, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घ्यावी, अशी जागरूक भूमिका नागरिकांनी घेतल्यास शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध होऊ शकतो. त्यामुळे शहरवासीयांची कचरा वाहक घंटागाडीत कचरा टाकावा. गाडी येण्यास विलंब होत असेल तर थोडीशी वाट पहावी, परंतु कचरा रस्त्यावर टाकू नये.
नगरपरिषदेचे कर्मचारी अनेक ठिकाणी स्वच्छता करीत असतात, साचलेला कचरा उचलत असतात. त्याच ठिकाणी बहुतांश नागरिक घरातील कचरा टाकतात. त्यामुळे स्वच्छतेची मोहीम मोडकळीस पडते. स्वच्छतेसाठी शहरवासीयांकडूनही ‘जबाबदारीचा’ हात पुढे असला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर शहर होऊ शकेल. स्वच्छ भारत अभियान हे केवळ भिंतीवरील घोषवाक्य किंवा रंगरंगोटीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसावे, हीच अपेक्षा आहे.

























