ताम्हिणी घाटातील स्वप्नील धावडे मृत्यू प्रकरण
पुणे, 03 जुलै (हिं.स.) : पावसाळी विकेंड सहलीचा आनंद, मित्र परिवारासह आयोजित वर्षा पर्यटन आणि आनंदाचे क्षण यासर्वाला गालबोट लावणारी घटना पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरातील प्लस व्हॅलीत घडली. राष्ट्रीय बॉक्सिंगपटू आणि माजी सैनिक स्वप्नी धावडे ट्रॅकिंगनंतर कुंडात पोहण्यासाठी उतरले आणि पुन्हा परत आलेच नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या आयुष्यातील हे अखेरचे क्षण त्यांच्या मुलीनेच मोबाईलमध्ये शूट केले होते आणि लेकिने काढलेला अखेरचा व्हिडीओच सर्वत्र व्हायरल होतोय.
सैन्यातून सेवानिवृत्तीनंतर पुण्यात जिम ट्रेनर असलेले स्वप्नील धावडे साहसी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. निसर्ग, पर्यटन, साहस यांची मनापासून आवड असल्याने मित्र परिवार आणि एकुलत्या एक मुलीसह 32 जणांचा ग्रुप घेऊन 29 जून रोजी ते ताम्हिणी घाट परिसरातील प्लस व्हॅली येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते. दिवसभर ट्रॅकिंगचा आनंद घेतल्यानंतर सर्वांनाच परतीचे वेध लागले होते. परंतु, पावसाच्या पाण्यामुळे फेसाळणाऱ्या कुंडात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. घरी परतण्यापूर्वी कुंडात सूर मारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कुंडाच्या दुसऱ्या बाजुला उभ्या असलेल्या आपल्या 10 वर्षीय मुलीला त्यांनी व्हिडीओ शूट करायला सांगितले.
ठरल्यानुसार स्वप्नील यांनी कुंडात उडी घेतली आणि लेकिने तो व्हिडीओ शूट करणे सुरू केले. विडलांनी कुंडात घेतलेली उडी, पोहून पार केलेले अंतर, किनाऱ्यावर येण्यासाठी केलेला प्रयत्न, पावसाळ्यामुळे निमुळते झालेल्या दगडांनी त्यांना दिलेला दगा आणि पाण्याच्या प्रवाहापुढे हतबल होऊन वाहून गेलेले वडील सर्व काही कॅमेऱ्यात आणि तो कॅमेरा चालवणाऱ्या चिमुकलीच्या डोळ्यात संग्रहित होत होते. किनाऱ्यावर येण्याचा स्वप्नील यांचा प्रयत्न अपयशी ठरला आणि ते कुंडाच्या खळखळणाऱ्या पाण्यात वाहून गेले.
हे सर्व अघटीत आपल्या मोबाईलमध्ये शूट करणारी त्यांची चिमूकली पुरती हादरली आहे. आनंदाचे क्षण आणि निसर्गाचे सौंदर्य चित्रीत करताना त्यात नियतीची क्रुरता देखील कॅमेऱ्यात कैद झाली. अनाहूतपणे वाट्याला आलेले आयुष्याचे हे भयानक स्वरूप त्या चिमूकलीला निःशब्द करून गेलेय. स्वप्नील यांच्या अवेळी मृत्यूमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी लेकीच्या मनावर झालेला कुठाराघात आणि त्यामुळे आलेली भणंगावस्था काळजाला चरे पाडून जाते.