नांदेड – देगलूर शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते सरकार ढाबा या मार्गावरील दुभाजकावर बसविण्यात आलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून अंधारातच आहेत. दररोज सकाळी नागरिक देगलूर महाविद्यालय व होट्टल रोडकडे व्यायामासाठी जात असतात मात्र त्यांची पहाट अंधारातच सुरुवात होते. यामुळे देगलूरकारांकडून नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहराला प्रकाशित करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते सरकार ढाबा दरम्यान मुख्य रस्त्यावर तब्बल २२ पथदिवे उभे करण्यात आले आहेत. यापैकी दोन खांब जमीनदोस्त झाले तर बाकी विस पथदिवे बंद अवस्थेत आहेत. लाखो रुपये खर्च करून नागरिकांसाठी ही योजना आखण्यात आली परंतु योजनेतही अक्षरशः अंधारच दिसून येतो. नगरपरिषद देगलूरच्या प्रशासनाकडून यासंदर्भात मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुण तरुणींना धावताना दुखापत होऊ शकते. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रश्नही उपस्थित होत आहे. या मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थी, पोलिस व आर्मी भरती करणारे तरुण – तरुणी, विरंगुळ्यासाठी चालणारे जेष्ठ नागरिक, व्यायामासाठी येणारे देगलूरवासी मोबाईलचे टार्च चालू करुन मार्गक्रमण करीत आहेत. आतातरी प्रशासनाच्या डोक्यात कर्तव्य नावाच्या टार्चचा उजेड पडणार का?
या मार्गावर दिवे बंद असूनही कोणी चौकशी का करत नाही? महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? समाजाचा विकास करू इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधींना हा अंधार दिसत का नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या खांबावर राजकीय पुढाऱ्यांची बॅनरबाजी मात्र जोशात होत आहे. ते खांब नागरिकांना उजेड देण्यासाठी आहेत की राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनेरबाजीसाठी आहेत? हे आता नगरपरिषदेच्या प्रशासनाने घोषीत करावे, असा सवाल सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता पाहायचे इतकेच की, देगलूर नगरपरिषद अंधारावर प्रकाश टाकते का, की नागरिकांना आणखी काही दिवस टॉर्चच्या प्रकाशातच चालावे लागणार?
















