मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे दीर्घकाळ जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करणारे संजय देशमुख (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता आणि शासकीय जनसंपर्क क्षेत्रातील एक संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले.
विशेष म्हणजे विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यातच ते सहभागी होते. अनेक नेते, अधिकारी आणि पत्रकारांशी त्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने अनेकांना धक्का बसला.
अनके वर्षांपासून उपमुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी
संजय देशमुख हे गेल्या अनके वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या संयम, व्यावसायिकता आणि प्रभावी कामकाजामुळे त्यांनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये महत्त्वाचा दुवा होते.
अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार
संजय देशमुख यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन सोमवार १४ जुलै रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत वरळी पोलीस स्टेशनजवळील शासकीय निवासस्थानी ठेवले जाणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
अजित पवार यांची भावनिक श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवर शोक व्यक्त करत म्हणाले, “मागील अनके वर्षांहून तो माझा जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारा होता. संजय देशमुख याच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला. तो समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार म्हणाले.
‘ते कपडे पुन्हा वापरायचे आहेत’; मित्राची भावुक आठवण
एका पत्रकाराने सोशल मिडीयावर लिहिलेल्या भावुक पोस्टमधून संजय देशमुख यांचा सहज, विनोदी स्वभावही दिसून येतो. गेल्या गुरुवारी विधानभवनात भेट झाल्यावर मी त्यांच्या वाढत्या वजनावर हलक्याफुलक्या शब्दांत टोमणा मारत विचारलं ‘तुमचे जुने कपडे फेकून दिले असतील ना?’ त्यांनी हसत उत्तर दिलं. ‘नाही रे, सगळे ठेवले आहेत, वजन कमी झाल्यावर पुन्हा वापरायचे आहेत. आणि आज सकाळी त्यांच्या निधनाचा मेसेज पाहिल्यावर धक्काच बसला.