मोहोळ तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती होण्यासाठी, मोहोळ तालुक्यातुन जाणाऱ्या भीमा नदीवर मिरी येथे, तर सीना नदीवर शिरापूर येथे बॅरेज बंधाऱ्यासाठी तसेच बोपले व एकुरके या ठिकाणच्याही बॅरेज बंधाऱ्यांना मंजुरी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागतासाठी मोहोळ विधानसभा मतदार संघातून सहा ते सात हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, मोहोळ तालुक्यातील काही भाग पाण्या पासून अद्यापही वंचित आहे.जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी बॅरेज बंधाऱ्या शिवाय पर्याय नाही. वरील प्रमाणे नद्यावर बॅरेज बंधारे बांधले तर उजनी वरील ताण कमी होणार असून शेतकऱ्यांना कायम स्वरूपी शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. गोदावरी नदीवर प्रत्येक ठिकाणी ज्या प्रमाणे बॅरेज बंधारे बांधले आहेत तोच पॅटर्न भीमा व सीना नदीवर राबवला तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी उजनीचे एक रोटेशन ज्यादा मिळणार आहे, त्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले.


















