किनवट – मांडवा, नागझरी व झेंडिगुडा ही आदिवासी व ग्रामीण भागातील गावे असून या परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाची सुविधा अत्यंत तोकडी आहे. या मार्गावर नियमित बस सेवा नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता मांडवा–नागझरी–झेंडिगुडा ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा,किनवट यांच्या वतीने सागरताई शिंदे यांनी आमदार भीमराव केराम यांना निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बस सेवा नसल्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच शेतकरी व कामगार वर्गाला शिक्षण, उपचार व दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मांडवा–नागझरी–झेंडिगुडा हा मार्ग सुरू झाल्यास परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (एस.टी.) पाठपुरावा करून सदर बस सेवा तात्काळ सुरू करण्याबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सुनिता मुंडे, रमाबाई सानप, वंदना कुमरे, सरस्वती आत्राम, ज्योतीताई साळवे पाटील, अजय शिंदे पाटील, दीपक शिंदे, अनिरुद्ध केंद्रे, चंद्रकांत साळवे पाटील आदी उपस्थित होते.


























