मंगळवेढा – शहरातील शिवप्रेमी चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य-दिव्य पुण्यस्मृती अश्वारूढ पुतळा परिसरात झालेल्या अतिक्रमणाबाबत सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा यांच्या वतीने मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
शिवप्रेमी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक व प्रेरणादायी पुतळा शहराच्या शान म्हणून उभा आहे. मात्र या पुतळा परिसरालगत लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या कमानीसमोर काही छोटे व्यावसायिक व टपरीधारकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे पुतळा परिसरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था तसेच एकूणच सौंदर्यावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
दररोज मोठ्या संख्येने नागरिक, शिवभक्त व पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचीही शक्यता वाढली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणाची पवित्रता व शिस्त भंग पावत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
तरी सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे तसेच कमानी बरोबरच रस्ता होणेसाठी तम्मा जगदाळे यांचे दुकाना बरोबर रोडवरील डिव्हायडर कट करावा आणि संबंधित व्यावसायिकांना नगरपरिषदेच्या नियमानुसार अन्यत्र पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिवप्रेमी व नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सतिश द-याप्पा दत्तु,भगवान चव्हाण,सुरज चव्हाण, अँड संभाजी विठठल घुले, अनिल सुभाष मुदगल, विनायक कलुबर्मे, बाळासाहेब नागणे यांनी निवेदन दिले आहे.


















