पुणे , 28 जून (हिं.स.) जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ग्यानबा तुकारामाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालताच पालखीचा इनामदार वाड्यात पहिला मुक्काम असेल. तिथं रात्री आरती, मग कीर्तन होईल. लाखोंच्या संख्येने देहूत वारकरी दाखल झाले आहेत. हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आषाढी वारीसाठीच्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी प्रस्थान वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी आळंदीत दाखल होत आहेत. यंदा मृग नक्षत्रातील पाऊस समाधानकारक असल्याने मराठवाडा विदर्भातील वारकऱ्यांचा उत्साह अमाप दिसून येत आहे.
जगतगुरू संत तुकाराम महाजारांचा ३३९ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. ग्यानबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती. काल पासून देहूत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. इंद्रायणी तिरी वैष्णवांचा मेळा भरला होता.सकाळी इनामदार वाड्यात जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. तिथून टाळ मृदंगच्या गजरात मुख्य मंदिरात पादुका आणण्यात आल्या. काही वेळातच अश्व आणि दिंड्याचे देऊळ वाड्यात आगमन झाले. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर ठीक पावणे तीनच्या सुमारास तुकोबांच्या पालखीने ग्यानबा तुकारामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून साध्या वेशात पोलीस पोलीस फिरत होते. चोरट्यांवर आणि संशयितांवर पोलोसांची नजर होती.
बहुसंख्येने या भागातील वारकरी दोन दिवसांपासून आळंदीत दाखल झाले आहेत. एकीकडे प्रशासनाची वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याची लगबग तर दुसरीकडे धर्मशाळांमधून हरिनामाचा गजर सुरू झाल्याने आळंदीत वातावरण भक्तीमय झाले आहे.