सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादीवरील हरकतींच्या निराकरणासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज विविध भागात थेट पाहणी केली. शहरात विविध ठिकाणी मतदारांशी संवाद साधला.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2025 अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. प्रारूप मतदार यादीवर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची पडताळणी करण्यासाठी महानगरपालिकेने प्रभागनिहाय पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून सविस्तर सर्व्हेक्षण व छाननीचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
आज दि. 2 डिसेंबर 2025 रोजी आयुक्त सचिन ओम्बासे यांनी प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकतींची प्रत्यक्ष मतदार याद्यांची सत्यता तपासण्यासाठी प्रभाग क्र. 8, 9, 11 व 12 मधील विविध भागांमध्ये स्वतः भेट देऊन सर्वेक्षण कार्याची माहिती घेतली. यामध्ये प्रभाग क्र. 8 व 9 मधील जोडबसवण्णा चौक, रविवार पेठ तसेच प्रभाग क्र. 9, 11, 12 मधील कर्णीक नगर, एकतानगर, अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर या भागांचा समावेश होता. यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सह अभियंता रामचंद्र पेंटर, प्रदीप निकते, संदीप भोसले,पथक समन्वक दीपाली मेटकरी, योगीराज याटकर, उपतुकडी प्रमुख जे. के स्वामी, अरविंद दोमल यांच्यासह कर्मचारी उपस्थिती होते.
प्राप्त हरकती व निष्कर्ष असा – प्रभाग क्र. 8 व 9, रविवार पेठ हरकतदार इंजापुरे व येमुल यांच्या हरकतीवर पथकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांची हरकत योग्य असल्याचे निदर्शनास आले. प्रभाग क्र. 12 ते प्रभाग क्र. 9 – मतदार वर्गीकरण हरकत – हरकतदार बजरंग कुलकर्णी यांनी प्रभाग 12 मधील 368 मतदारांचे प्रभाग 9 मध्ये वर्गीकरण करण्याबाबत हरकत दिली होती. पथकाच्या सर्व्हेक्षणात 368 पैकी फक्त 31 मतदारच प्रभाग 9 मध्ये येतात असे स्पष्ट झाले. त्यानुसार ही हरकत भागशः योग्य ठरली असून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रभाग क्र. 12 ते प्रभाग क्र. 11 – मतदार समावेशन
अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर येथील हरकतदार श्री कळमंडे यांनी प्रभाग 12 मधील 20 मतदारांचे प्रभाग 11 मध्ये समावेश करण्याबाबत हरकत नोंदवली होती. पथकाच्या सर्व्हेक्षणात ही हरकत योग्य आढळल्याने संबंधित दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येत आहे.
प्रारूप मतदार यादीतील आपली नोंद तपासून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत हरकत/सूचना सादर कराव्यात. महानगरपालिका प्रशासन पारदर्शक व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
अंतिम मतदार यादी10 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर दि. 3 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. प्राप्त सर्व हरकतींचे प्रभाग पथकांकडून सखोल सर्व्हेक्षण करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक दुरुस्त्या करण्यात येतील. या प्रक्रियेअंती अंतिम मतदार यादी दि. 10 डिसेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

























