सोलापूर :- सप्टेंबर २०२५ या महिन्यातील पावसामुळे हाहाकार उडाला. सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली,नांदेडसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी व महापूरामळे “होत्याचं नव्हतं झालं…” अनेक संसार उद्धवस्त झाले, अनेकांचे संसार रस्त्यावर आले, अशा याअपरिमित हानीमध्ये अनेक शाळा, वाचनालयाचे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे म्हणजेच मुलांच्या शैक्षणिक बाबींचीही हानी झाली…..अशावेळी “वही गेली, पुस्तक गेलं, दफ्तरचं गेलं वाहून बळ देण्या शिकण्यासाठी येईलच कुणीतरी धावून” या ओळी जागवण्यासाठी काव्यप्रेमी परिवाराने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी आपण धावून आलेल्या काव्यप्रेमी व इतर मान्यवरांनी जमा केलेल्या मदतनिधीतून ३५ हजार रुपयांच्या वह्या, लेखनसामग्रीचे वाटप आज दिनांक १ डिसेंबर रोजी औराद व होनमुर्गी परिसरातील शाळेत करण्यात आले.
औराद येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व परिसरातील लहान मोठ्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सौ.जयश्री सुतार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ”दैनंदिन परिपाठ” या छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.त्या प्रसंगी औराद गावचे पोलिस पाटील सैफन बेगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरूनाथ तांबेकर, जुना काळातील पोस्टमन काका बाबूराव घोडके, काव्यप्रेमीचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे यांच्यासह बरेच मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मठपती सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक जतकर सर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख सर व इंदिरानगर शाळेचे मुख्याध्यापक पाटील आणि शाळेतील शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले. त्यानंतर दुपारच्या सत्रात दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सौ.जयश्री सुतार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली होनमुर्गी येथे जिल्हा परिषद शाळेत त्या शाळेतील व परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. याचवेळी परिसरातील पूरबाधीत वाचनालयांना १० हजार रुपयांच्या पुस्तकांचेही वाटप करण्यात आले.























