चांगले काम हाती घेतल्यावर ते पूर्णत्वास न्यावे. परंतु, काम पुर्ण झाल्यावर “मी केले..मी केले” असा अभिमान न बाळगता ते विसरून जावे असे अनोखे तत्त्वज्ञान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. लोकसभा निवडणुकीसाठई नामांकन अर्ज सादर करण्यापूर्वी गडकरींनी हिंदुस्थान समाचारशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपली सुस्पष्ट मते मांडलीत.
दिल्लीच्या राजकारणात येण्यापूर्वी गडकरी 2009 ते 2013 पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. यापूर्वी 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. गडकरींनी केलेली विकास कामे मैलाचा दगड मानली जातात. परंतु, गडकरी कधीच कौतुकाने हुरळून जात नाहीत. लोक पैसा, पद आणि प्रतिष्ठा यांच्या मागे धावण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. पण या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत. माणसाचा स्वभाव आणि काम हीच त्याची खरी ओळख असते असे गडकरी यांनी सांगितले. मंत्री म्हणून हाती घेतलेले विकास कार्य अपूर्ण ठेवत नाही आणि काम पूर्ण झाल्यावर विसरून जातो असे गडकरी म्हणाले. गडकरींच्या मते, नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे ही जनता आणि माध्यमांची जबाबदारी आहे. त्यामुळे अमुक गोष्ट मी केली याचा भ्रम आणि अभिमान ठेऊ नये असे गडकरींनी सांगितले.
संविधान हा देशाचा आत्मा आहे
भाजपला आरक्षण हटवायचे आहे, राज्यघटना बदलायची आहे अशी अफवा विरोधक पसरवतात. सोशल मिडीयावर देखील अशा गोष्टी वेगाने पसरल्या आहेत. यावर आपले मत मांडताना गडकरी म्हणाले की, आमच्या मनात डॉ.आंबेडकरांनी लिहीलेल्या संविधानाबाबत आदर आहे. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या लोकांनी देशात आणीबाणी लादून संविधान गुंडाळून ठेवले होते, त्यांनी आमच्याबद्दल खोटा प्रचार केला. काँग्रेस लोकांना स्वत:कडे आकर्षित करू शकत नाही, त्यामुळे आरक्षण आणि संविधानाच्या नावाखाली जनतेला भ्रमित करण्याचे काम करते असा आरोप गडकरींनी केला.
माणसाची ओळख त्याच्या कृतूतीन होते
गडकरी म्हणाले की, कोणतीही व्यक्ती जात, धर्म, भाषा, लिंग, पक्ष यामुळे महान बनत नसते, तर प्रत्येक जण आपले गुण आणि कार्यामुळे महान बनतो. चांगले काम हे कुणाचे पेटंट नाही सर्वाना चांगली कामे करता येतात. त्यामुळेच मी देशात 50 लाख कोटी रुपयांची कामे प्रामाणिकपणे करू शकलो. कुणीही माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. राजकारणात लोकांचा विश्वास आणि प्रेम हेच खरे भांडवल आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप झाल्यास मी राजणारण सोडण्यासही तयार आहे.
अमर्यादित अधिकार नकोत
सर्वसाधारणपणे सकारात्मक असणारे गडकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे चांगलेच संतापलेले दिसले. कालबाह्य कायदे, आठमुठे अधिकारी आणि लालफीतशाही कारभारावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या मर्यादा निश्चित कराव्यात. देशात 1980 च्या वन संवर्धन कायद्याने अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले आहेत. उत्तराखंडचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, वन आणि पर्यावरण एनओसी न मिळाल्याने राज्यात 10 हजार कोटी रुपयांची कामे रखडली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली नसती तर आतापर्यंत ही विकासकामे आकाराला आली असती. गडकरी म्हणाले की, पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे आहे, मात्र कालबाह्य आणि कठोर कायदे बदलण्याची गरज आहे. तसेच अधिकाऱ्यांना अमर्यादित अधिकार नकोत असेही त्यांनी सांगितले.
इलेक्टोरल बाँडचा हेतू चांगला
देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर आपले मत मांडताना गडकरी म्हणाले की, कोणताही पक्ष पैशाशिवाय चालत नाही. काही देशांमध्ये, सरकारे राजकीय पक्षांना निधी देतात. आपल्या देशात अशी व्यवस्था नाही. म्हणून आम्ही चांगल्या हेतूने 2017 मध्ये इलेक्टोरल बाँड योजना आणली होती. राजकीय पक्षांना थेट निधी मिळावा, पण नावे (देणगीदारांची) उघड केली जाणार नाहीत. याचे कारण सत्तेतील पक्ष बदलला तर समस्या निर्माण होतील. पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही निवडणूक रोख्यांची ही प्रणाली आणल्याचे गडकरी यांनी सांगितले. आमचा हेतू चांगला होता. सर्वोच्च न्यायालयाला त्यात काही त्रुटी दिसली आणि ती सुधारण्यास सांगितले तर सर्व पक्ष एकत्र बसून एकमताने विचार करतील असे गडकरींनी सांगितले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे नितीन गडकरी यांना नागपूरकरांच्या सुख-दुःखाचे साथीदार म्हंटले जाते. गडकरींसाठी नागपूर केवळ मतदारसंघ नसून कुटुंब आहे. त्यामुळे नागपूरकर अडचणीत असले की गडकरी पुढे येतात. नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनासारख्या साथीच्या काळात, गडकरींनी आपल्या कुटुंबासाठी सदस्य जे काही करतो ते सर्व केले. तेच लोक त्यालाही आपलेच मानतात. त्यामुळे गडकरी आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या विजयाबद्दल आश्वस्त आहेत.