तभा फ्लॅश न्यूज/घनसावंगी-अंबड : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीजवळील भंगजळगाव माळावरील श्री गणपती मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे. रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून, सीसीटीव्ही कॅमेरे उखडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या चोरीप्रकरणी मनोहर खोजे यांनी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, याआधी देखील याच मंदिरातून दोन ते तीन वेळा दानपेट्या चोरीला गेल्या असून पोलिसांना आजवर एकाही घटनेत चोरट्यांना अटक करता आलेली नाही.
या वेळी चोरट्यांनी अधिक योजनाबद्ध पद्धतीने मंदिरात प्रवेश करत प्रथम दानपेटी फोडली आणि नंतर सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि यंत्रणा पूर्णपणे उखडून नेली. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फुटेज उपलब्ध नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला आहे.
गावकऱ्यांनी तीर्थपुरी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत यापुढे अशा घटनांना आळा बसावा, तसेच चोरट्यांना तत्काळ अटक करून दानपेटी आणि चोरी गेलेल्या कॅमेऱ्यांचा शोध लावावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.