पंढरपूर – विज्ञान प्रसार आणि तंत्रज्ञान विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या व्यापक हेतूने १९७६ साली स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ वी संस्थेच्या अध्क्षपदी, मटेरियल सायन्स क्षेत्रतील विख्यात वैज्ञानिक डॉ.दिनेश पुंडलिक अमळनेरकर यांची निवड करण्यात आली आहे.डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ. होमी सेठना यांच्या सारख्या दिग्गज वैज्ञानिकांनी भूषवलेल्या अध्यक्षपदी डॉ.दिनेश अमळनेरकर यांची निवड सर्वानुमते एकमाने झाली असून विज्ञानक्षेत्रातील अनेकांनी या निवडीचे सार्थ निवड म्हणत डॉ अमळनेकर यांचे अभिनंदन केले आहे.
विशेष म्हणजे डॉ.दिनेश अमळनेरकर हे मूळचे पंढरपूरचे असून मटेरियल सायन्स क्षेत्रातील एक ख्यातनाम संशोधक आहेत. ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल’ या विषयातील एक जागतिक तज्ज्ञ म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सी-मेट ( सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी) या नामवंत संस्थेचे माजी महासंचालक म्हणून डॉ. अमळनेरकर यांचे योगदान विज्ञानक्षेत्रात सर्वश्रुत आहे.
दक्षिण कोरिया आणि जपान या दोन देशांच्या विद्यापीठांमध्ये डॉ.अमळनेरकर यांनी केलेले संशोधन कार्य आणि विज्ञानक्षेत्रात केलेले भरीव योगदान उल्लेखनीय असून त्यांना विज्ञान क्षेत्रातील अनेक नामवंत संस्था व विद्यापीठांनी विशेष पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे नुकतेच त्यांना गेली १०० वर्षे कार्यरत अशा नामवंत ‘इंडियन केमिकल सोसायटी’ च्या मद्रास येथे झालेल्या ६२ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘जीवन गौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी आजवर विविध आंतरराष्ट्रीय विज्ञानविषयक नियतकालिकांतून २३० पेक्षा अधिक विषयावर संशोधनात्मक निबंध लिहिलेले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे डॉ.अमळनेरकर यांच्या नावावर २४ भारतीय आणि ३ अमेरिकेची पेटन्टस् आहेत.
डॉ.अमळनेरकर यांची ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीचे माजी अध्यक्ष डॉ.प्रा.जी.डी.यादव यांनी स्वागत केले असून डॉ.अमळनेकरांचे ज्ञान व अनुभव अॅकॅडमीच्या विज्ञान प्रसार कार्यात मोलाचे योगदान देईल असे म्हटले आहे.
ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ.विजय भटकर या दिग्गजांनी महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. अशा संस्थेच्या अध्यक्षपदाचा मान डॉ.अमळनेरकर यांच्या सारख्या उत्साही व विशेषदृष्टी असलेल्या वैज्ञानिकारा लाभलेला आहे. त्यामुळे यापुढे ‘महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेन’च्या विज्ञान प्रसार व जनजागरण कार्यास अधिक गती लाभणार आहे. ही संस्था अधिक समाजाभिमुख होण्याची गरज असून डॉ. अमळनेरकर त्यात यशस्वी होतील अशी विज्ञानप्रेमींची अपेक्षा आहे.
























