पंढरपूर – पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांबरोबरच विरोधातील सर्व नगरसेवक देखील आपलेच मानून सर्वांच्या सहकार्याने या पुढील काळात काम करणार असल्याचा विश्वास पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांनी तमाम पंढरपूरकरांना दिला.
येथील नगरपालिकेच्या कार्यालया मध्ये येवून डाँ.भालके यांनी सोमवारी (ता.५) नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. पंढरपूर नगरपरिषेदचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पुष्पगुच्छ देवून नगराध्यक्षा डाँ.भालके यांचे स्वागत केले. त्या नंतर त्यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. पदभार स्विकारल्या नंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगिरथ भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, सुधीर धोत्रे आदींसह सर्व आजी, पदाधिकारी तसेच आजी, माजी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके म्हणाल्या, पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या वेळी आम्ही जी आश्वासने दिलेली होती की,जसे धुळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर तसेच स्वच्छ पंढरपूर आणि सुंदर पंढरपूरसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. नगराध्यक्षपदी काम करीत असताना आपल्या कडून कोणत्याही प्रकारचे राजकारण केले जाणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांची पालिकेत संख्या कमी आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे कामकाज करीत असताना हे आव्हान वाटणार काय ? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे नगरसेवक आमचे आहेत तसेच विरोधी पक्ष,आघाडीचे नगरसेवक देखील आपणाला परके नाहीत. ते देखील आपलेच आहेत. सर्वांनाच सोबत घेऊन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याच्या भूमिकेस आपले प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी पंढरपूरच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या अडीअडचणी काय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे देखील सूतोवाच यावेळी त्यांनी केले.
या बरोबरच कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचे सध्या ठरविलेले नाही. ज्यावेळी असा काही निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी सर्व पंढरपूरकरांशी या संदर्भात विचारविनीमय करुनस सर्वांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.
————–
प्रथम नामदेव पायरीचे दर्शन
नगरपालिकेत जावुन नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारण्यापूर्वी डाँ.प्रणिता भालके आणि त्यांचे तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, आजी,माजी पदाधिकारी हे विठ्ठल मंदिराच्या महाव्दारात नामदेव पायरी जवळ एकत्र आले. त्या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन श्री संत नामदेव पायरीचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत या सर्वांचे नगरपालिकेच्या कार्यालयाकडे नगराध्यक्षपदाचा पदभार घेण्यासाठी प्रस्थान झाले.
————————-
स्व.आमदार भालकेंच्या प्रतिमेचे पूजन
नगरपालिकेत पदभार स्विकारण्यासाठी आल्यानंतर डाँ.प्रणिता भालके यांनी पालिकेतील सभागृहात जावून सभागृहातील थोर आदर्शमहापुरुषांच्या तसेच स्व.आमदार भारत भालके यांच्या प्रतिमांचे पूजन करुन दर्शन घेतले. त्यानंतर पदभार स्विकारण्यासाठी त्या नगराध्यक्षांच्या दालना मध्ये आल्या त्या ठिकाणी त्यांनी पदभार स्विकारला.

























