नायगांव – इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यां साठी आयोजित जिल्हास्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धा मरवाळी तांडा (ता. नायगाव) येथील माध्यमिक आश्रम शाळेत उत्साहात व यशस्वीपणे पार पडल्या.
दि. २३ जानेवारी रोजी आयोजित या स्पर्धा शाळेचे प्राचार्य विजयकुमार देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली
घेण्यात आल्या.या स्पर्धांचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रतन लक्ष्मण राठोड होते. तर उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे साह्यक संचालक सचिन खुने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमेश मोरे (इ.मा.ब.क. वि., नांदेड), गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील,प्रभारी विस्तार अधिकारी उध्दव ढगे, सेवानिवृत्त प्राचार्य किशन राठोड उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती व कै. वसंतराव नाईकांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात प्राचार्य विजयकुमार देशमुख यांनी, “विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडागुणांना वाव देण्यासाठी विभागाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या संधीचे सोने करून खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध करावे,” असे आवाहन केले.
यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत खेळांच्या मैदानाचे उद्घाटन करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध आश्रम शाळांचे सुमारे ६० संघ सहभागी झाले होते.
व्हॉलीबॉल,खो-खो व कबड्डी या तीन सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
खो-खो या स्पर्धेत मरवाळी तांडा माध्यमिक आश्रम शाळेतील १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष रतन राठोड, प्राचार्य विजयकुमार देशमुख, संस्थेचे कार्य वाहक डॉ.मधुकर राठोड यांनी संघमार्गदर्शक आनंद राव सूर्यवंशी व सूर्यकांत जाधव तसेच सर्व खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या क्रीडा स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी मरवाळी तांडा व परिसरातील हजारो खेळाडू व नागरिकांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य विजयकुमार देशमुख यांनी केले.
या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक आश्रम शाळेतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


























