धाराशिव – राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत कार्यरत असलेले वाहक आणि चालक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी करण्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी धाराशिव विभागात सुरू आहे. ते प्रत्येक आगारामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे सक्त आदेश विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी दिले आहेत.
एसटी महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून राज्यातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी लाखोंच्या संख्येने दररोज प्रवास करतात. सुरक्षित आणि सुखरुप प्रवास हे ब्रीद एस टी महामंडळाचे असून याप्रमाणेच प्रवाशांना सेवा दिली जाते. ही सेवा एस टी महामंडळ अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. मात्र, यातील काही चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जात असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व आगारांमध्ये चालक आणि वाहक यांची ड्युटीवर जाण्यापूर्वी म्हणजेच आगारात आल्याबरोबर अल्कोहोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एस टी महामंडळ धाराशिव विभाग नियंत्रक अनिल पाटील यांनी सर्व आगार प्रमुखांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष यंत्रणा कार्यान्वित करून अल्कोहोल तपासणी करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पथकाची नेमणूक करून तपासणी सुरू केले आहे.
यावेळी तपासणी करणारे वाहतूक निरीक्षक याहिया काझी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कोमटवार व इतर पर्यवक्षीय कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.























