बार्शी – येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी आगारात दि. २४ जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे सुरक्षितता अभियान ही राबविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज केकान, रुपेश शेलार, राहुल बोंदर व स्वप्निल गडवे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक मधुरा संदिपान जाधवर तसेच व्यासपीठावर स्थानक प्रमुख विजय हांडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक नितीन गावडे, वाहतूक निरीक्षक गणेश चव्हाण, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक आकाश नाईक हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे घोळवे यांनी उपस्थित असलेल्या चालकांना वाहन चालवताना अपघात घडू नये याबाबत मार्गदर्शन केले.
प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित प्रवास म्हटले की, एसटीने प्रवास अशी एसटीची प्रतिमा जपणे आणि ती वृद्धिंगत करणे याची जबाबदारी चालक बंधूंवर आहे. चालकांनी कामावर असताना अन्य कोणताही विचार करु नये फक्त एवढेच लक्षात ठेवावे, असे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा तसेच चांगले उत्पन्न आणणारे, निर्व्यसनी चालकांचाही प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघुलकर यांनी केले व वरिष्ठ लिपीक महेंद्र क्षीरसागर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने एसटीचे चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.

























