देगलूर – नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने २७ पैकी १५ नगरसेवकांसह नगराध्यक्षपद जिंकत एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर नगरपरिषद कारभाराला वेग आला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विषय समित्या व स्थायी समित्यांची रचना करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून पाणीपुरवठा व जल निसारण समितीच्या सभापतीपदी नगरसेवक बबलू उर्फ एकनाथ शेषराव टेकाळे यांची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली.
सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादीकडून नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची घोषणा करण्यात आली. शहरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पाणीपुरवठा व जल निसारण समिती टेकाळे यांच्या हाती सोपवण्यात आल्याने नगरपरिषदेत विकासाभिमुख निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ उर्फ बबलू टेकाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांचे कार्य सुपरिचित आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अपंग, दिव्यांगांना आवश्यक साहित्याची मदत, अंध विद्यार्थ्यांना पेटीचे वितरण, दिवाळीच्या सणानिमित्त निराधारांना वस्त्र वाटप, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त अन्नदान, विविध सामाजिक उपक्रमासाठी देणग्या, गरजूंना आर्थिक मदत, शाळेसाठी संगणक अशा विविध उपक्रमांत त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
याच सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून नगरपरिषद निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकत भरघोस मतांनी त्यांना विजयी केले. निवडून आल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रभागातील मूलभूत समस्यांकडे लक्ष देत विकासकामांना गती दिली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे.
त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाणीपुरवठा व जल निसारण समितीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. या निवडीमुळे टेकाळे समर्थकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थिर होत असताना, शहराच्या पाणीपुरवठा व जल निसारण व्यवस्थेला अधिक सक्षम, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी एकनाथ टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















