पंढरपूर – नगर परिषदेमध्ये बुधवारी स्थायी व विषय समित्यांच्या सभापती,सदस्यांची निवड करण्याबाबत बैठक आयोजिण्यात आलेली होती. या बैठकी मध्ये सर्व विषय समितीच्या सभापतींची निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
काही दिवसापूर्वीच उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांचे निवड करण्यात आली. यानंतर बुधवारी (ता.२८) विषय समिती सभापती व सदस्य निवडीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी जाहीर केला होता. त्यानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली आहे.
दरम्यान पालिकेतील नियोजन व विकास समिती सभापती उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, बांधकाम समिती सभापती प्रदीप पवार, पाणीपुरवठा समिती सभापती अमोल डोके, आरोग्य विभाग समिती सभापती सुजित कुमार सर्वगोड, शिक्षण विभाग समिती सभापती मनीषा देशपांडे, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रियंका तारापूरकर यांची तर उपसभापती अनिता ढवळे यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सदस्य म्हणून लक्ष्मण शिरसाट,अँड.सुनील वाळूजकर व माधुरी धोत्रे यांची निवडी करण्यात आल्या. पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले.
यावेळी बोलताना भाजपाचे पालिकेतील गटनेते वासुदेव बडवे, पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे गटनेते सुजित सर्वगोड यांनी सांगितले की, भाजप व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या आहेत. दरम्यान विविध समित्यांच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत.
























