केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांतून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी आज, सोमवारी निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या सर्व खासदारांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभेचे सदस्य राज्यांच्या विधानसभांच्या माध्यमातून निवडले जातात.
राज्यसभेतील सर्वाधिक रिक्त होणाऱ्या जागा उत्तर प्रदेशातील आहेत (10). याशिवाय बिहार आणि महाराष्ट्रातील 6 जागाही रिक्त होत असून, त्यावर निवडणुका होणार आहेत. तसेच पश्चिम बंगाल (5), मध्य प्रदेश (5), गुजरात (4), कर्नाटक (4), आंध्र प्रदेश (3), तेलंगणा (3), राजस्थान (3), ओडिशा (3), छत्तीसगड (1), निवडणूक त्याच दिवशी हिमाचल प्रदेश (1), हरियाणा (1) आणि उत्तराखंड (1) च्या रिक्त जागांवरही मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. आगामी 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. येत्या 16 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत नावे मागे घेता येतील. तर 27 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. आगामी 29 फेब्रुवारीपूर्वी निवडणुकीचे काम पूर्ण होईल.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण 56 खासदारांमध्ये आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगालच्या खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 रोजी संपत आहे. ओडिशा आणि राजस्थानमधील खासदारांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 रोजी संपणार आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांमध्ये केंद्री मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या अभूतपूर्व फुटीनंतर आमदार कोणाला मतदान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.