सोलापूर : महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख आधार आहे. शिक्षण, उद्योग, कला आणि सामाजिक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय कार्य करत समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिला महोत्सवांमुळे महिला बचत गटांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यापक व्यासपीठ मिळते, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग तसेच DAY-NULM, युसीडी यांच्या वतीने ९ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित “महिला महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम २०२६” या महोत्सवाचे उद्घाटन आज इंद्रभुवन परिसर येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, गटनेते वाहिदा बानो शेख, गटनेते अमोल शिंदे, गटनेते चेतन नरोटे, गटनेते वैभव हत्तुरे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर विनायक कोंड्याल पुढे म्हणाले की, सोलापूर महानगरपालिकेमार्फत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असून अशा महोत्सवांमुळे महिला बचत गटांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यापक व्यासपीठ मिळते, असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या कलागुणांना व उद्योजकतेला चालना देणारा हा महोत्सव नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. महिला महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, महिला बचत गटांचे उपक्रम आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हा महोत्सव ९ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत इंद्रभुवन परिसर येथे सुरू राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महोत्सवात ४० महिला बचत गटांचे विविध उत्पादनांचे स्टॉल
या महोत्सवात शहरातील ४० महिला बचत गटांनी विविध उत्पादनांचे स्टॉल उभारले असून घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, कपडे, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आदी उत्पादनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटनानंतर महापौरांसह उपस्थित मान्यवरांनी सर्व स्टॉलला भेट देत महिला बचत गटांच्या उपक्रमांची पाहणी केली व त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. पहिल्याच दिवशी विविध स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.























