सोलापूर – पूर्व विभाग दत्त मंदिरात श्री दत्त जयंतीच्या औचित्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीदत्त उपासना गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून हा पवित्र सप्ताह २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे.
सप्ताहाच्या प्रारंभी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने परिसर दुमदुमला. पारायणासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले असून अंदाजे २०० पेक्षा अधिक भक्तांनी सहभाग नोंदविला.
गुरुचरित्र पारायणाला दैवी महत्त्व असून या पारायणामुळे विवाहासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होणे, उत्तम व सुसंस्कारित संतानप्राप्ती, घरातील कलह व ग्रहबाधा दूर होणे तसेच समस्त जनकल्याण साध्य होणे असा भाविकांचा दृढ श्रद्धाभाव आहे. त्यामुळे या धार्मिक उपक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हा संपूर्ण पारायण सप्ताह गोविंद तुम्मा महाराज, अंजनेयलू दुस्सा व गणेश देवसानी यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्धरीत्या पार पडत आहे. कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक श्रीनिवास गरदास, न्यानेश्वर वल्लमदेशी, हरी गौडा यांनी मनापासून परिश्रम घेतले असून भक्तांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
देवस्थानचे संस्थापक दत्तात्रय सिंघम व अध्यक्ष महेश देवस्थान यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण सप्ताहाचे आयोजन अधिक भक्तिमय आणि समृद्ध करण्यात आले आहे. सप्ताहाच्या दरम्यान दररोज नामस्मरण, सत्संग व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून २ डिसेंबर रोजी सप्ताहाचा समारोप सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

























