माढा – मानेगाव आर्या कृषी महाविद्यालयात जागतिक वन दिन, जागतिक जल दिन आणि जागतिक हवामान दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. तृप्ती राठोड उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मार्गदर्शन सत्राने झाली. जागतिक वन दिनानिमित्त प्रा. अक्षय शेळके यांनी पृथ्वीवरील वनांचे महत्त्व अधोरेखित करत जैवविविधतेचे रक्षण व जंगल संवर्धनाची गरज स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड व पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक जल दिनानिमित्त प्रा. अमोल माळी यांनी पाण्याचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व पटवून देत पाणी बचत, योग्य वापर आणि जलसंधारणाचे महत्त्व विशद केले.तसेच, जागतिक हवामान दिनानिमित्त प्रा. स्नेहल साठे यांनी बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली. हवामान बदलाचा पर्यावरण व मानव जीवनावर होणारा परिणाम त्यांनी स्पष्ट केला.यावेळी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी समृद्धी ताटे, साक्षी शिवशरण व प्राची ढवळे यांनी मनोगत व्यक्त करत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास प्रा. हनुमंत निगुडे व धनंजय कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय भाषणात डॉ. तृप्ती राठोड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समजावून सांगत सकारात्मक कृती करण्याचे आवाहन केले.





















